दीर्घ सेवा देण्याची तयारी असल्यास सरकारी वैद्यकीय कॉलेजात आरक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यामध्ये नवीन कायदा करून शासकीय, महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या वेळी काही ठरावीक जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत, मात्र त्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये दीर्घकाळ वैद्यकीय सेवा द्यावी लागेल. पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यास पाच वर्षे तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यास सात वर्षे सेवा द्यावी लागेल. यामुळे सरकारी रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची संख्या वाढण्यास मदत होईल.

या धोरणाअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशात आरक्षण देण्याबाबत विधानमंडळात विधेयक मांडण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

राज्यामध्ये शासकीय रुग्णालयात विविध विभागांमध्ये वैद्यकीय अधिकारी व विशेषज्ञांची कमतरता असल्याने त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होतो. शासकीय व महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर व पदवीपूर्व विद्यार्थी यांनी बंधपत्रित सेवा पुरविणे आवश्यक आहे. असे असले तरी त्यांच्या सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. तसेच बाँड लिहून देणारे उमेदवारदेखील ग्रामीण, डोंगराळ व दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे शासकीय रुग्णालयात दीर्घकाळ सेवा देणार्‍या वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रवेशात आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व विशेषज्ञांची कमतरता काही प्रमाणात दूर करता येईल, तसेच शासकीय सेवेत स्वेच्छेने काम करण्यास डॉक्टर्स उपलब्ध होतील.

संरक्षण दलाच्या धर्तीवरची योजना

पुण्यातील संरक्षण दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे वैद्यकीय पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात. या महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या उमेदवारांनी ठरावीक वर्षांच्या कालावधीसाठी संरक्षण दलातील वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या धर्तीवर पुरेशी रुग्णसेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील आरोग्य व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची योजना आहे.

पदवीसाठी 10 तर  पदव्युत्तर अभ्यासक्रमात 20 टक्के जागा राखीव

राज्यामध्ये नवीन कायदा करून शासकीय, महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या वेळी काही ठरावीक जागा आरक्षित ठेवण्यात येतील. या योजनेंतर्गत प्रवेशित उमेदवारांना किमान कालावधीसाठी शासकीय रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक असेल. यामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी दहा टक्के राखीव जागा ठेवण्यात येणार असून त्यामधून प्रवेश घेणार्‍यांना सात वर्षे तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वीस टक्के  राखीव जागा ठेवण्यात येणार असून त्यामधून प्रवेश घेणार्‍यांना पाच वर्षे सेवा द्यावी लागेल.

सावकारांनी परवाना क्षेत्राबाहेर दिलेले शेतकर्‍यांचे कर्ज माफ

विदर्भ व मराठवाडय़ातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकर्‍यांना दिलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत आज घेण्यात आला.

विविध नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ व मराठवाडय़ातील शेतकर्‍यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने एप्रिल 2015मध्ये घेतला होता. या निर्णयानुसार 19 जिह्यांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या मंजुरीनुसार 31 मार्च 2018 पर्यंत 46 हजार 735 शेतकर्‍यांची 55 कोटी 96 लाख 65 हजार रुपयांची मुद्दल आणि 10 कोटी 59 लाख 73 हजार रुपयांचे व्याज असे एकूण 66 कोटी 56 लाख 38 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. ही रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जापोटी 1393 सावकारांना वितरित करण्यात आली आहे.

लातूर व धाराशीवमधील वॉटर ग्रीडसाठी 3 हजार कोटींच्या निविदा

मराठवाडय़ाला कायमचे दुष्काळमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त मराठवाडय़ाला वॉटर ग्रीडने पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानुसार मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत लातूर आणि धाराशीव या दोन जिह्यांसाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य व दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा आदी कामांसाठी 3 हजार 122 कोटी रुपयांच्या पहिल्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी संभाजीनगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत वॉटर ग्रीड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेसाठी व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी गेल्या वर्षी निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार इस्रायल शासनाच्या मेकोरोट डेव्हलपमेंट ऍण्ड एंटरप्रायजेस कंपनीसोबत करार करण्यात आला. या करारानुसार सर्व अहवाल फेब्रुवारी 2020पर्यंत सादर करण्यात येणार आहेत.