लोकेश राहुलला डच्चू; शुभमन गिलला संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करू न शकलेल्या सलामीवीर लोकेश राहुलला हिंदुस्थानच्या क्रिकेट संघातून डच्चू देण्यात आला आहे. अखिल हिंदुस्थानी सीनियर निवड समितीने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली. यावेळी युवा फलंदाज शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच रोहित शर्माला आगामी मालिकेत सलामीवीर म्हणून खेळवण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 2 ऑक्टोबरपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन देशांमधील ही मालिका ‘गांधी-मंडेला’ या नावाने खेळवली जाते. दोन देशांमधील या मालिकेतील लढती विशाखापट्टणम, पुणे, रांची येथे खेळविण्यात येणार आहेत. त्याआधी 26 सप्टेंबरपासून तीनदिवसीय सराव सामना होणार असून बोर्ड अध्यक्षीय संघाचीही यावेळी घोषणा करण्यात आली. रोहित शर्माकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

मुंबईकर सोडवणार सलामीचा प्रश्न

हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने 2018 सालापासून सात खेळाडूंना सलामीला पाठवून बघितले. यामध्ये लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, पार्थिव पटेल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक संधी लोकेश राहुलला मिळालीय. मात्र 13 कसोटींत त्याला फक्त 22.31च्या सरासरीने 491 धावाच करता आल्यात. पृथ्वी शॉने 118.50 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय, मात्र सध्या तो संघात नाहीए. रोहित शर्माने याआधी 2009 ते 2012 या कालावधीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फक्त तीन वेळा सलामी फलंदाज म्हणून भूमिका बजावली आहे. कसोटीत तो एकदाही सलामीला आलेला नाही. आता हा मुंबईकर फलंदाज टीम इंडियाचा सलामीचा प्रश्न सोडवेल का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटींसाठी चमू

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रिद्धीमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि शुभमन गिल.

बोर्ड अध्यक्षीय संघ खालीलप्रमाणे:

रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, सिद्धेश लाड, के. एस. भारत (यष्टिरक्षक), जलाज सक्सेना, धर्मेंद्रसिंह जाडेजा, आवेश खान, इशान पोरेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव.