वेट लीजवरील बसेसनी बेस्टचा तोटा कमी होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट चालविण्यासाठी दरदिवशी प्रति कि.मी. 110 रुपये खर्च येतो. त्यामुळे बेस्ट तोट्यात जात आहे. उलट वेट लीजच्या बसेस चालविण्याचा प्रति कि.मी. खर्च 80 ते 85 रुपये इतका कमी असल्याने बेस्टचे दरदिवशीचे 20 रुपये वाचणार आहेत. या भाडेतत्त्वावरील बसेसनी बेस्टचा तोटा कमी होणार असल्याचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, ‘बेस्टला आर्थिक तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी तिला कर्जमुक्त करणे गरजेचे होते. त्यामुळे 1200 कोटी रुपये पुरविण्यात आले होते, परंतु त्यातील 70 टक्के रक्कम कर्ज फेडण्यासाठी बेस्टने खर्च केली आणि तीस टक्के रक्कम बेस्टने कर्मचाऱयांची देणी देण्यासाठी खर्च केली. तरी हरकत नाही. त्यासाठी आणखी निधी पुरविला जाणार, असेही परदेशी यांनी स्पष्ट केले.

बेस्ट फिडर रूट म्हणून उपयोगी ठरणार

मुंबई शहरात मेट्रोचे जाळे वाढणार असल्याने भविष्यात बेस्टमार्फत मेट्रो, मोनो आणि रेल्वेच्या प्रवाशांना स्थानक ते घर व कार्यालय ते स्थानक अशी फिडर सेवा म्हणून बेस्टचा वापर करता येणार असल्याचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्पष्ट केले.

मुंबईकरांना मर्सिडीजसारखा प्रवास

बेस्टने नुकतेच मोबाईल ऍप लाँच केले असून त्यातील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. लवकरच बेस्टच्या ताफ्यात 3 ते 4 हजार इलेक्ट्रिक बस समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास प्रदूषणमुक्त होणार असून अवघ्या 5 ते 10 रुपयांत मुंबईकरांचा प्रवास मर्सिडीजसारखा होणार असल्याचे परदेशी यांनी स्पष्ट केले.

रस्ते मोकळे केल्याने बेस्टच्या वेगात वाढ

नवीन पार्किंग धोरणात दंडाची रक्कम वाढविण्यामागे तिजोरी भरण्यापेक्षा रस्ते मोकळे करण्याचे उद्दिष्ट होते. दंडाच्या भीतीने रस्ते मोकळे झाल्याने बेस्टच्या वेगात 5 ते 7 टक्के वाढ झाली आहे. बेस्टचा वेग आणखी 20 टक्के वाढविण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बेस्टचे तिकीट ऍपवर

बेस्टचे कॉमन मोबॉलिटी कार्ड येत्या नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. हे कार्ड बेस्टच्या आयटीएमएस प्रणालीशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी आपले तिकीट पेटीएम किंवा फोनपेसारख्या ऍपद्वारे ऑनलाइन काढू शकणार आहेत. परिणामी सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद कमी होतील.

जेव्हा आयुक्त बसस्टॉपवर उभे राहतात

यावेळी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्वतः मुंबईकर प्रवाशांशी हितगुज करीत बेस्टच्या नव्या मोबाईल ऍपसंदर्भातील त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि बेस्टच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते