जगज्जेता कुस्तीपटू राहुल आवारेचे जंगी स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कझाकिस्तानच्या नूर सुल्तान शहरात झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कास्यपदक जिंकण्याची कामगिरी करून मायदेशात परतलेला मराठमोळा मल्ल राहुल आवारेचे कर्मभूमी पुण्यामध्ये मंगळवारी मोठय़ा उत्साही वातावरणात आणि जल्लोषात स्वागत झाले. महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला मराठमोळा मल्ल ठरलेल्या आपल्या हिरोच्या स्वागतासाठी लोहगाव विमानतळावर कुस्तीशौकिनांची मोठी गर्दी झाली होती. राहुलने जागतिक कुस्ती स्पर्धेत 61 किलो गटात कास्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, राहुल आवारेचे वस्ताद ‘अर्जुन’वीर काका पवार, राज्याचे क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, सहाय्यक क्रीडा संचालिका नीलिमा अडसूळ, जिल्हा क्रीडा अधिकारी, विजय संतान, तालुका क्रीडा अधिकारी विद्या चिरस, वस्ताद गोविंद पवार, गोकुळ तालमीचे वस्ताद व्यंकटराव परसे, राहुलच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील शंभरहून अधिक कुस्तीपटू आणि कुस्तीशौकिन राहुलच्या स्वागतासाठी आले होते. याचबरोबर आपल्या लेकाचा कौतुक सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी राहुलचे वडील बाळासाहेब आवारे आणि आई शारदाबाई हेही यावेळी उपस्थित होते. मैदान जिंकून आलेल्या राहुलचे विमानतळावर आगमन होताच चाहत्यांनी त्याच्या नावाचा एकच जयघोष केला. ऐतिहासिक कामगिरी करून परतलेल्या राहुलला उचलून घेण्यासाठी त्याच्या तालमीतील सहकाऱयांमध्ये शर्यत रंगली होती. विमानतळाहून निघाल्यानंतर राहुल आवारेने प्रथम श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर राहुलने गोकुळ तालमीत जाऊन आपले वंदनीय गुरू स्वगीय हरिश्चंद्र बिराजदार यांच्या प्रतिमेचे दर्शन करून जिंकलेले पदक त्यांच्या चरणावर ठेवले. त्यानंतर दत्तवाडी चौकातून जांभुळवारी रोडने राहुल आवारेची आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.