
नाशिक शहर परिसरासह इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यांत बुधवारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले. अस्वली, पाडली आणि घोटी स्थानकांदरम्यान रुळावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे मुंबईहून नाशिकला जाणार्या एक्सप्रेस जागोजागी खोळंबल्या. परिणामी, प्रवाशांना गाडीतच मुक्काम करावा लागला.
पावसाने सलग काही तास हजेरी लावल्यामुळे नाशिकच्या बर्याचशा भागांमध्ये पाणी साचले. याचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला. मुंबईहून नाशिकला चाललेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड गोदावरी एक्प्रेसची घोटी स्थानकावर रखडपट्टी झाली. त्याचबरोबर इतर काही गाड्या ठाणे, कल्याण अशा वेगवेगळ्या स्थानकांवर खोळंबल्या. पावसाचा जोर वाढताच राहिल्याने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. रुळावरचे पाणी सायंकाळपर्यंत न ओसरल्याने रेल्वे प्रवाशांना गाडीमध्येच मुक्काम करावा लागला. यात लहान मुले, वृद्धांचे प्रचंड हाल झाले.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
जिह्यांत इतर ठिकाणी मध्यम ते तुरळक पाऊस झाला असून दारणासह दहा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दारणा धरणातून सर्वाधिक 5120 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. कडवा- 1692, आळंदी- 86, भावली- 135, नांदूरमध्यमेश्वर- 3962, पालखेड- 437, करंजवण- 150, वाघाड- 154, ओझरखेड- 267, तिसगाव- 15 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गुरुवारीही जिह्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.






























































