
माजी आमदार रमेश कदम यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कदम यांनी अशा प्रकारे पाचव्यांदा पक्षांतर केले आहे. त्यामुळे सध्या चिपळूणात त्यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा रंगली आहे.
मूळचे काँग्रेसवासी असलेले माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीत, 2014 च्या लोकसभा निवडणूकीत शेकापमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली. त्यानंतर नगरपरिषद निवडणूकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप पक्षात प्रवेश, तिथही फारसं जमलं नाही. मग पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर पुन्हा काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे.
माजी आमदार रमेश कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आपण काँग्रेसचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितले की,पक्ष अडचणीत आहे तुझ्या सारख्या कार्यकर्त्यांची मला गरज आहे. तु पुन्हा पक्षात ये असे सांगितले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी माझे बोलणे झाले, असल्याचे रमेश कदम यांनी सांगितले.


























































