
कश्मीरमध्ये मानवाधिरांचे उल्लंघन होत असल्याचा कांगावा करण्यात येत आहे. या सर्व आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कश्मीरमध्ये आता शांतता प्रस्थापित होत आहे. कोणत्याही भागात आता नाकाबंदी नाही. तसेच काही भागात टेलिफोन सेवांवर बंदी आहे, अशी बंदी म्हणजे मानवाधिरांचे उल्लंघन होत नाही असे शहा यांनी स्पष्ट केले. नवी दिल्लीमध्ये माजी सरकारी अधिकाऱ्यांसाठी रविवारी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शहा बोलत होते. जम्मू कश्मीरमधील कर्फ्यूचा मुद्दा फक्त काही लोकांच्या मनातच असल्याचे त्यांनी सांगितले.
कश्मीरमध्ये आता कोणेतही निर्बंध नाहीत. कश्मीरमधून 196 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कर्फ्यू हटवण्यात आला आहे. आता फक्त 8 पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 लागू आहे. बाकी इतर गोष्टी फक्त लोकांच्या मनात आहेत, असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. कलम 370 मुळेच कश्मीरमध्ये दहशतवाद रुजला आणि फोफावला. दहशतवादामुळे कश्मीरमध्ये 41, 800 नागरिकांचा बळी गेला. मानवाधिरांच्या मुद्दा उपस्थित करणाऱ्यांनी दहशतवादामुळे बळी गेलेल्यांच्या विधवा आणि त्यांच्या मुलांचे काय झाले असा प्रश्न का पडत नाही, असा सवालही त्यांनी केला. टेलिफोन सेवा नसणे हे त्यांच्यासाठी मानवाधिरांचे उल्लंघन ठरते, मात्र, 41 हजार लोकांचा बळी जाणे त्यांना मानवाधिकारांचे उल्लंघन वाटत नाही काय असा सवाल त्यांनी केला. कलम 370 लागू करणे ही ऐतिहासिक चूक होती, ती सुधारण्यास 70 वर्षे लागली. आता जम्मू कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.





























































