
मुंबईकरांना आता मुंबई ते गोवा ही सफर खासगी तत्त्वावरील ट्रेनने करण्यास मिळणार आहे. कारण दोन शहरांना जोडणार्या इंटरसिटी गाडय़ांना प्रायव्हेट ऑपरेटरद्वारे चालविण्याचे नवे धोरण रेल्वे बोर्डाने अंगिकारल्याने आता ‘तेजस’ एक्स्प्रेससारख्या आलिशान व वेगवान गाडय़ांमधून चाकरमान्यांना खासगी तत्त्वावर प्रवास घडणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या प्रायव्हेट ऑपरेटरद्वारे जास्तीत जास्त फायदेशीर मार्गावर दिल्ली ते लखनऊ आणि मुंबई ते अहमदाबाद मार्गावर खासगी तत्त्वावर ‘तेजस’सारख्या वेगवान एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. आता मुंबई ते मडगाव, मुंबई ते पुणे, मुंबई ते संभाजीनगर अशा मार्गावर प्रायव्हेट इंटरसिटी एक्स्प्रेस चालविण्याची रेल्वे बोर्डाची योजना आहे.
अलिकडेच रेल्वे बोर्डाने फायद्याच्या मार्गावर प्रायव्हेट ऑपरेटर्सद्वारे ‘तेजस’ एक्स्प्रेससारख्या गाड्या चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी दिल्ली ते लखनऊ एक्स्प्रेस 6 ऑक्टोबरपासून धावणार आहे तर मुंबई ते अहमदाबाद मार्गावर महाराष्ट्रातील निवडणूक झाल्यावर नोव्हेंबरपासून प्रायव्हेट ‘तेजस एक्स्प्रेस’ धावणार आहे. या गाडय़ांना आयआरसीटीसीमार्फत प्रायव्हेट कंपन्यांना दिल्याने त्यांची सेवा, गाडीतील जेवण, स्वच्छता व इतर सुविधांचा दर्जा वाढणार आहे. या गाडय़ांच्या तिकीट विक्रीचे अधिकारही प्रायव्हेट कंपन्यांना देण्यात येणार आहेत.





























































