
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे – पारगाव येथे नदीत बुडालेल्या तिन्ही मुलांचे मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना सोमवारी सकाळी यश आले. रविवार 29 रोजी दुपारी तीनच्या दरम्यान नदीवर पोहायला गेलेली ही तीन मुले बेपत्ता झाली होती. नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे कपडे, मोबाईल, चपला, सापडल्याने त्या मुलांचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. वैभव चिंतामण वाव्हळ (वय 15), श्रेयश सुधीर वाव्हळ (वय 15), प्रणव राजेंद्र वाव्हळ (वय 16) सर्व राहणार शिंगवे पारगाव अशी बेपत्ता मुलांची नावे होती. ते रविवारची सुट्टी असल्याने जवळच असलेल्या नदीत पोहायला गेले होते. बराच वेळ होऊनही ते घरी आल्याने घरच्यांनी तपास केला असता नदीच्या बाजूला कालच त्यांचे कपडे आढळून आले होते.
या बाबत स्थानिक नागरिकांनी मंचर पोलिसांना कळवले असता मंचर पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी या मुलांचे शोधकार्य सुरू केले होते. मात्र अंधार असल्याने शोधकार्यात मोठे अडथळे येत होते. एनडीआरएफच्या टीमने सोमवारी सकाळी मुले पोहत असलेल्या ठिकाणी शोध घेतला असता तासाभरात या तीन मुलांचे मृतदेह आढळून त्यांना आले. या मुलांच्या दुर्दैवी मृत्युने वाव्हळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे. सोमवारी शिंगवे गाव बंद ठेवण्यात आले आहे. यातील प्रणय वाव्हळ व वैभव वाव्हळ ही 2 मुले शिंगवे येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेत होती तर श्रेयस वाव्हळ हा पारगाव येथील संगमेश्वर विद्यालयात शिकत होता. त्यांच्या या अचानक जाण्याने सर्व मित्र, शिक्षक व ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीही माहिती घेतली. सबंधित कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होऊन त्या कुटुंबीयांना धीर देत त्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम व अनेक मान्यवर उपस्थित होते.




























































