फेलिक्सने मोडला बोल्टचा विक्रम; 11 सुवर्णपदकांचा रेकॉर्ड मागे टाकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेची महिला धावपटू एलिसन फेलिक्स हिने जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेतील उसेन बोल्टची मक्तेदारी संपुष्टात आणली. तिने 4 बाय 400 मीटर मिश्र रिले शर्यतीत बाजी मारत जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेतील 12व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. याचबरोबर एलिसनने भूतलावरील सर्वांत वेगवान धावपटू असलेल्या जमैकाच्या उसेन बोल्टचा 11 सुवर्णपदकांचा विक्रम मोडीत काढला.

सहा वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन बनलेल्या 33 वर्षीय एलिसन फेलिक्सने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या या सुपर मॉमने बोल्टचा विक्रम मोडण्याची कमाल केली. अमेरिकेच्या रिले संघाने 3 मिनिटे 9.34 सेकंद अशा विश्वविक्रमी वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले. फेलिक्ससह विल्वर्ट लंडन, कर्टनी ओकोलो व मायकल कॅरी या चौकडीने हे सोनेरी यश संपादन केले. जमैकाच्या संघाने रौप्य, तर बहरीनने कांस्यपदक जिंकले. हिंदुस्थानचा रिले संघ या शर्यतीत सातव्या स्थानी राहिला. हिंदुस्थानी रिले संघात मोहम्मद, अनस, जिसना मॅथ्यू व निर्मल टॉम ही चैकडी होती.

जागतिक स्पर्धेत पाचव्यांदा सहभागी झालेल्या फेलिक्सने 2005मध्ये या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकले होते. तिने 200 मीटर शर्यतीत 3,400 मीटर शर्यतीत एक, 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत 3 आणि 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत चार अशी एकूण 12 सुवर्णपदके जिंकली. उसेन बोल्टने 100 मीटर शर्यतीत 3,200 मीटर शर्यतीत 4, 4 बाय 400 मीटर शर्यतीत 4 अशी एकूण 11 सुवर्णपदके जिंकलेली आहते. 2017 मध्ये तो अखेरच्या वेळी जागतिक स्पर्धेत उतरला होता.

जमैकाच्या फ्रेजरची ऐतिहासिक कामगिरी

जमैकाच्या शेली ऍन फ्रेजर प्राइस हिनेही जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाचा चौकार ठोकून ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकणारी ती पहिली धावपटू ठरली. उसेन बोल्टसह अमेरिकेचा कार्ल लुइस व मॉरिस ग्रीन यांनी या स्पर्धेत 100 मीटर शर्यतीत प्रत्येकी तीन सुवर्णपदके जिंकलेली आहेत. फ्रेजरने या तिघांचाही विक्रम अखेर मोडीत काढला. महिलांमध्ये फ्रेजरनंतर अमेरिकेच्या मरियन जोन्सने या स्पर्धेत 2 सुवर्णपदके मिळविली आहेत.

विएरा पदक जिंकणारा सर्वांत वयस्क खेळाडू

जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेतील पुरुषांच्या चालण्याच्या शर्यतीत पदक जिंकणारा पोर्तुगालचा 43 वर्षीय जोआओ विएरा हा सर्वांत वयस्क खेळाडू ठरला. त्याने 4 तास 4 मिनिटे 59 सेकंद वेळेसह रौप्यपदक मिळविले. जपानच्या युसुके सुजुकीने 4 तास 4 मिनिटे 20 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर कॅनडाचा इवान डुनफी कांस्यपदकाचा मानकरी ठरला. महिला गटात चीनच्या लियांग रुई हिने सुवर्ण, तिचीच देश भगिनी ली माओकुओ हिने रौप्य, तर इटलीच्या एलोनोरा एना जियोर्जी हिने कांस्यपदक जिंकले.