पीटर आणि इंद्राणी मुखर्जीचा घटस्फोट, फॅमिली कोर्टाची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीना बोरा हत्येप्रकरणी गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात असलेल्या मीडिया बॅरन पीटर मुखर्जी आणि त्याची पत्नी इंद्राणीच्या घटस्फोटाला मुंबईतील कुटुंब न्यायालयाने आज अखेर एकदाची मंजुरी दिली. परस्पर सहमतीने (कन्सेन्ट टर्म) दाखल केलेला या दोघांच्या घटस्फोटाचा अर्ज कुटुंब न्यायालयाने मान्य केल्याने गेल्या 17 वर्षांपासूनचा या दोघांचा संसार अखेर आज संपुष्टात आला.

शीना बोरा हत्येप्रकरणी तीन वर्षे तुरुंगात वेगवेगळे राहावे लागल्यामुळे आपोआप आलेला दुरावा तसेच यापुढे अलग होण्याचे या दोघांनी परस्पर सहमतीने ठरविल्यामुळे न्यायालयाने देखील त्यांच्या घटस्फोटाची मागणी मान्य करण्याशिवाय पर्याय उरला नाही.

63 वर्षीय पीटर मुखर्जी याने आपल्याहून 16 वर्षांनी लहान असलेल्या इंद्राणीशी नोव्हेंबर 2002 साली लग्न केले. येत्या महिन्यात त्याचा 64वा वाढदिवस असून तत्पूर्वीच त्याचा इंद्राणीशी काडीमोड झाला आहे.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पीटर आणि इंद्राणी मुखर्जीने परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेऊन वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठीचा अर्ज (म्युच्युअल कन्सेन्ट डायव्होर्स प्ली) दाखल केला होता. अर्ज दाखल केल्यापासून सहा महिन्यांचा ‘कुलिंग ऑफ पिरियड’ संपल्यानंतर न्यायालयात दोघांना पुन्हा पाचारण करून ती दोघं आपल्या निर्णयावर ठाम आहेत की नाही याची खात्री करून घेते. त्याचसाठी आज पीटर आणि इंद्राणीला न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे ठामपणे सांगितल्याने प्रधान न्यायाधीश एस. एस. सावंत यांनी त्यांचा घटस्फोट मंजूर केला.

नवरात्रीचे उपवास आणि अनवाणी प्रवास
आज घटस्फोटाचा निर्णय होणार हे दोघांनाही अपेक्षित होते. परंतु इंद्राणी विशेष आनंदात होती. कारण घटस्फोटासाठीचा अर्ज इंद्राणीने स्वतः दाखल केला होता. सफेद टॉप आणि सफेद जीन्स घातलेल्या इंद्राणीने पिवळा दुपट्टा अंगावर घेतला होता. नवरात्रीच्या 9 दिवसांतला आजचा पिवळा रंग म्हणून इंद्राणी पिवळा दुपट्टा ओढून आली होती. तिने 9 दिवस उपवासही ठेवलेले असून न्यायालयात ती अनवाणीच आली होती तर टी-शर्ट आणि ट्राउझर घालून आलेल्या पीटरने छातीवर कापडी पट्टा लावला होता.