
हिंदुस्थानचे वीरपुत्र विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानच्या हवाई घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडले होते. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्या स्क्वॉड्रन 51चा वायुदलाकडून सन्मान विशेष सन्मान होणार आहे. वायु दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया हे अभिनंदन यांच्या स्क्वॉड्रनचा विशेष सन्मान करणार आहेत.
जम्मू कश्मीर येथील पुलवामा या ठिकाणी 14 फेब्रुवारी रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने बरोबर तेरा दिवसांनी पाकव्याप्त कश्मीरमधील बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईक दरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना पळवून लावताना आकाशात हिंदुस्थानी हवाईदल आणि पाकिस्तानी हवाई दलाची विमाने समोरासमोर आली. यावेळी अभिनंदन यांनी मिग 21 बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ 16 फायटर विमानावर आर- 73 मिसाइल डागले. या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले ऍमराम मिसाइल वर्धमान यांच्या मिग 21 बायसन विमानाला धडकले. त्यानंतर अभिनंदन यांचे मिग-21 पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले.
The number 9 squadron whose Mirage 2000 fighter aircraft carried out the Balakot aerial strikes on February 26 during ‘Operation Bandar’, also to be awarded unit citation. https://t.co/8yL6uWaWa9
— ANI (@ANI) October 6, 2019
हिंदुस्थानने सर्व बाजूंनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनंतर पाकिस्तानने अभिनंदन यांना मायदेशी पाठवले. 27 फेब्रुवारीला दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांनी वीर चक्र हा शौर्य पुरस्कार जाहीर झाला. परमवीर चक्र, महावीर चक्र यानंतर वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. आता त्यांच्या स्क्वॉड्रनचा वायुदलातर्फे विशेष सन्मान केला जाणार आहे. त्यांच्यासह स्क्वॉड्रन लीडर मिंटी अगरवाल यांच्या 601 सिग्नल युनिटलाही बालाकोट एअर स्ट्राईकच्यावेळी केलेल्या कामगिरीसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

























































