
शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपराच मानली जाते. यंदाचा मेळावा दणक्यात साजरा होणार असून वाजतगाजत आणि गुलाल उधळत येणार्या लाखो शिवसैनिकांमुळे शिवतीर्थावर सोमवारी सायंकाळी जणू शिवसागरच उसळणार आहे. शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे. ऐन विधानसभा निवडणूक प्रचार काळात यंदाचा मेळावा साजरा होणार असल्याने अवघ्या देशाचे लक्ष शिवसेनेच्या पारंपरिक ‘शस्त्रपूजना’कडे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या निवडणुकीतील विजयाचा कोणता मंत्र देतात याकडेच लागले आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरांचा वारसाच होय. राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आवर्जून या मेळाव्यासाठी शिवतीर्थावर अलोट गर्दी करतात आणि विचारांचे सोने लुटतात. त्यातूनच राज्याच्या, देशाच्या राजकारणाला दिशा मिळते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्याच्या दसरा मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करणार असून शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात प्रथेनुसार शस्त्रपूजन आणि सोनेवाटप कार्यक्रमही होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच हा मेळावा साजरा होणार असल्याने विजयाचा संकल्प करणाराच मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांवर कोणती तोफ डागणार, राज्याच्या राजकारणाला कोणती दिशा मिळणार याकडे प्रसार माध्यमांचे आणि राजकीय पक्षांचेही लक्ष लागले आहे.


























































