
शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा मंगळवारी प्रचंड उत्साहात आणि दणक्यात साजरा झाला. शिवतीर्थावर जनताजनार्दनाचे विराट दर्शन घडले आणि या भगव्या वादळाला साद घालत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली… देशातील घुसखोरांना लाथा घालून हाकलून लावा… तेव्हा शिवतीर्थावरील कोपरान् कोपरा टाळय़ांच्या कडकडाटाने दणाणून गेला. उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम आवाज उठवला होता कश्मीरातून 370 कलम हटवण्याचा. अयोध्येत राममंदिर आणि देशभरात समान नागरी कायदा व्हायलाच हवा, असेही शिवसेनाप्रमुखांनी ठणकावून सांगितले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी कश्मीरातून 370 तर हटवले, पण आता गरज आहे ती राममंदिर आणि समान नागरी कायद्याची. उद्धव ठाकरे यांनी या वेळी ‘थकलेल्या’ काँगेस-राष्ट्रवादीची पिसे तर काढलीच, पण आम्ही सत्तेत होतो, आहोत आणि सत्तेत राहणारच, असेही ठामपणे सांगितले. विद्यार्थ्यांपासून गोरगरीबांपर्यंत कुणाला काय मिळणार याचा ‘संकल्प’च उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. ते म्हणाले, गरीबांना दहा रुपयांत अन्नथाळी देणार आहोत, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बससेवा सुरू केली जाणार आहे. अवघ्या एका रुपयात आरोग्य चाचणी होणार आहे, तर 300 युनिटपर्यंतचा वीज दर 30 टक्क्यांनी कमी केला जाणार आहे. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असा शब्द अवघ्या महाराष्ट्राला देतानाच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मंत्रालयावर भगवा फडकणार म्हणजे फडकणारच, असा वज्रनिर्धार केला तेव्हा पुन्हा एकदा शिवतीर्थावरील भगवे वादळ उसळून आले… टाळय़ांचा कडकडाट राज्यभर पसरला!
युती म्हटली की तडजोडी आल्याच. युतीमुळे महाराष्ट्रातील काही जागा शिवसेनेकडून सुटल्या आहेत. त्या सर्व मतदारसंघांत शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलंय. अहोरात्र मेहनत घेतलीय. त्या सर्व शिवसैनिकांची मी माफी मागतोय…
शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाच होय. यंदाचा मेळावा ऐन विधानसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत साजरा होणार असल्याने विजयाचा दृढसंकल्प करतच राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱयातून आलेल्या लाखो शिवसैनिकांनी शिवतीर्थावर अलोट गर्दी केली होती. दसरा मेळाव्यात प्रथेनुसार शस्त्र्ापूजा केली जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शस्त्र्ापूजेचा संदर्भ देत म्हणाले, माझ्यासमोर बसलेले आणि महाराष्ट्रभर पसरलेले शिवसैनिकच माझी खरी शस्त्र्ाs आहेत. या शस्त्र्ाांचीच पूजा करून विधानसभेवर भगवा फडकवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. या महिन्यात दोन विजयादशमी आल्या आहेत. एक आजची आणि दुसरी 24 तारखेची, निवडणूक निकाला दिवसाची, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी अवघे शिवतीर्थ दणाणून गेले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात विरोधकांच्या रडण्यावर जोरदार प्रहार तर केलाच पण युवाशक्तीला काम द्या, नाहीतर ती शक्ती युवाबॉम्ब बनेल, असा इशाराही दिला. युवाशक्तीने राजकारणात यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अशी जनताजनार्दनाला साद घालत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. अयोध्येत राममंदिर व्हायलाच हवे. ते शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते आणि ते पूर्ण व्हायलाच हवे असे ठासून सांगितले. ते म्हणाले, आता नवरात्री आहे. कोर्टाला सुट्टी आहे. याच दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला. त्यानंतर दिवाळी येत आहे. याच दिवशी लंकेवर विजय मिळून प्रभू राम अयोध्येत परतले. याही दिवशी कोर्टाला सुट्टी असते. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या सणांसाठी सुट्टी असते, पण राम जन्मले होते की नाही, त्यांचा जन्म अयोध्येत झाला की नाही यावर प्रश्न उभे केले जात आहेत. मला वाटते, असे जगाच्या कानाकोपऱयात घडत नसेल. पण राममंदिराच्या मुद्दय़ावर पंतप्रधानांनी सांगितले, थोडे थांबा. बोलू नका, कोर्टात केस सुरू आहे. या महिन्यात निकाल आहे. पण कोर्टाने न्याय दिला तर ठीक नाहीतर आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. विशेष कायदा करा आणि राममंदिर बांधा, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावताच शिवसैनिकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणांचा एकच गजर केला.
राममंदिराचा उपयोग सत्तेसाठी नाही, आम्ही वचनबद्ध आहोत!
राममंदिराचा मुद्दा हा राजकारणासाठी नाही तर संपूर्ण देशाची ही मागणी आहे. हिंदुत्वाची मागणी आहे. प्रभू श्रीरामांचे अनुकरण करणारी ही शिवसेना आहे. आयुष्यात आम्ही वचनाला जपतो. ‘प्राण जाय पर वचन न जाय’ ही शिवसेनेची वृत्ती आहे. वचन देतो ते पाळतो. राममंदिर बांधणार ही आमची वचनबद्धता आहे. ज्यावेळी राममंदिराचा विषयही नव्हता त्यावेळी शिवसेनेने ‘शिवधनुष्य’ ही निशाणी निवडली होती याची आठवण करून देतानाच पित्याला दिलेल्या वचनासाठी ज्यांनी सत्ता त्यागली त्या प्रभू रामचंद्रांचा उपयोग सत्तेसाठी करणार नाही, राममंदिर बांधणारच, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
धनगरांच्या काठीची तलवार होऊ द्या!
धनगर, कोळी, कोष्टी वंजारी आदी अठरापगड समाज शिवसेनेसोबत येत आहेत. देशावर प्रेम करणारे मुसलमानही आमच्यासोबत आहेत. देशावर प्रेम करा, तुमचे-आमचे भांडण नाही, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजालाही संदेश दिला. ते म्हणाले, प्रकाश शेंडगे यांनी मला धनगराची काठी आणि घोंगडे दिले आहे. पण धनगर बांधवांनी केवळ हाती काठी-घोंगडे बाळगायचे नाही तर तुमच्यावरील अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी या काठीला तलवारीची धार आली पाहिजे. आतापर्यंत काठी-घोंगडे देत आलात, पण आता सावध व्हा. तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे ती काठी अन्याय करणाऱया नाठाळांच्या माथी हाणा!
धनगर समाजाला आरक्षण देणारच!
युती केली तेव्हा शिवसेना झुकली असे म्हटले गेले; पण तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, आमची अडचण समजून घ्या. आम्ही तुमची अडचण समजून घेतली. आता महाराष्ट्राची अडचण तुम्ही सोडवा. मराठा आरक्षण दिले त्याप्रमाणेच आदिवासींच्या हक्कांना हात न लावता धनगर आरक्षणही देणार. इतकेच काय तर मुसलमान समाजाचेही न्याय्य हक्क आम्ही मिळवून देऊ. जनतेला दिलेल्या वचनापोटी आम्ही वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही देताना जनतेला दिलेली, एकमेकांना दिलेली वचने पाळावीच लागतील, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
शिवसैनिकांच्या पाठीवर वार करण्याची हिंमत करू नका!
शिवसैनिक ही माझी तलवार आहेत. गोरगरीबांच्या न्यायाचे रक्षण करणारी ही तलवार आहे. अन्याय करणाऱयांचा कोथळा बाहेर काढणारी ही माझी वाघनखे आहेत. या शिवसैनिकांच्या पाठीवर वार करण्याची हिंमत करू नका, असा इशाराच या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.
शिवसेना कुणासमोर झुकणार नाही. झुकेल ती फक्त शिवरायांसमोर आणि मराठी मातीच्या पुत्रांसमोर. हा झुकणारा मावळा नाही. मरेन नाहीतर मारेन ही शिवसैनिकांची जातकुळी आहे.
शिवसेना कुणासमोर झुकणार नाही!
लोकसभेच्या वेळी कुणाचे सरकार येईल सांगता येत नव्हते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शरद पवार, मुलायमसिंह, चंद्राबाबू नायडू, मेहबुबा मुफ्ती, मायावती, नितीश कुमार हे पंतप्रधान झालेले आपल्याला चालले असते का? म्हणून विचार केला… कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसच्या मागे आपली ताकद उभी राहू देणार नाही. हे ठरवून भगव्यासाठी युती केली. जे काही केले ते उघडपणे केले. आम्ही जे काही करू ते उघडपणे करू, प्रेमही उघडपणे करू आणि वैरही उघडपणे करू. जे काही केले ते शिवसैनिकांना विचारूनच केले. निवडणुकीच्या निकालानंतर जे चित्र उभे राहिले त्यावरही टीकाकारांनी ‘तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना’ अशी टीका केली. पण तरीही युती केली. उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपाची युती झाली; पण ती युती जनतेने स्वीकारली नाही. आमची युती प्रामाणिक आहे, पण त्यांची युती सत्तेसाठी होती म्हणून जनतेने त्यांना झिडकारले, असे सांगतानाच ‘शिवसेना कुणासमोर झुकणार नाही, झुकेल ती फक्त शिवरायांसमोर, मराठी मातेच्या पुत्रांसमोर. हा झुकणारा मावळा नाही. मरेन नाहीतर मारेन ही शिवसैनिकांची जातकुळी आहे’, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
थकून गेल्यासारखे वावरताहेत आणि लढायला उभे राहिलेत
370 कलम काढू नका. देशद्रोहाचे कलम काढू नका म्हणणाऱयांना पाठिंबा द्यायचा का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. शरद पवार, काँग्रेस यांना का टार्गेट करू नये? जोपर्यंत शिवसेना त्यांचे टार्गेट आहे तोपर्यंत टार्गेट करतच राहणार असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, सुशीलकुमार यांनी वक्तव्य केलंय की काँगेस-राष्ट्रवादी आता थकलेय. एकत्र येण्याशिवाय यांच्यासमोर पर्याय नाही. अरे कसे थकलात? 50 वर्षे खाऊन खाऊन थकलात काय! पहिले ठरवा तुमचा नेता कोण? शरद पवार की ज्यांच्यामुळे शरद पवारांनी काँग्रेस सोडली त्या सोनिया गांधी? थकून गेल्यासारखे वावरताहेत आणि लढायला उभे राहिलेत़ जास्त थकू नका, आमचे विजयाचे पेढे खाण्यासाठी ताजेतवाने राहा अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर आसुड ओढले.
सुशीलकुमार शिंदे म्हणतात, काँग्रेस–राष्ट्रवादी थकली. पन्नास–साठ वर्षेखाऊन खाऊन थकलात का? अहो, एवढे थकू नका. आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी ताजेतवाने रहा.
अजित पवार यांचे नक्राश्रू
आजपर्यंत मगरीच्या डोळ्यांतले अश्रू ऐकले होते, पण परवा अजित पवारांच्या डोळ्यांतले अश्रू पाहिल्यानंतर नक्राश्रू काय असतात हे कळले. डोळ्यांत पाणी आणत म्हणाले, राजकारण करणार नाही, शेती करणार. अरे शेती करणार ठीक आहे, पण धरणात पाणी नसले तर काय करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच एकच हशा पिकला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, माझा शेतकरी डोळ्यांत पाणी घेऊन आला होता तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? आज त्या कर्मानेच तुमच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. जे शिवसेनेशी जसे वागले ते तसेच्या तसे संपले. त्याच शिवसेनेच्या शस्त्राने तुम्हाला संपवलेय असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
सूडाचे राजकारण महाराष्ट्र सहन करणार नाही!
‘ईडी’सह सर्व यंत्रणा विरोधकांवर सूडाचे राजकारण करण्यासाठी वापरल्या जात आहेत असे शरद पवार म्हणाले. ते सूडाचे राजकारण असेल किंवा नसेल, पण हा महाराष्ट्र सूडाचे राजकारण कधी सहन करणार नाही. आज ईडी आली तेव्हा तुम्हाला सूडाचे राजकारण आठवले. पण 2000 साली काय झाले होते? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ‘सामना’तील अग्रलेख शोधून गुन्हा दाखल केला. निदान तेव्हा तरी तुम्ही ‘सामना’ वाचला. अरे, ‘सामना’ नेहमी वाचाल तर तुम्हीही वाचाल असा टोला लगावतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांना अटकेची भाषा करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावर कोण होते? आता तुम्ही सांगताय सूडाचे राजकारण होतेय म्हणून? तेव्हा तुम्ही काय केलेत, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. हिंदूंना वाचवले म्हणून गुन्हेगार ठरवणारी तुमची अवलाद आणि तुम्ही सांगता सूडाने वागताहेत. हा अनुभव बघितल्यानंतर आम्ही युती भाजपसोबत करायची नाही तर कुणासोबत करायची, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
युवाशक्तीकडे लक्ष द्या, नाहीतर युवाबॉम्ब होतील!
निवडणुका आहेत म्हणून बेभान सुटू तर त्याला अर्थ नाही. पहिल्या वेळी मतदान करणाऱयांना आपण काय देणार हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण हिंदुस्थान हा येत्या काही वर्षांत सर्वात तरुण देश असणार आहे. ही युवाशक्ती आहे. म्हटलं तर ही शक्ती आहे. याकडे लक्ष दिलं नाही तर उद्या ही शक्ती युवाबॉम्ब होईल. 22-23 वर्षांच्या हाँगकाँगमधील तरुणासमोर सर्वशक्तिशाली चीनला झुकावं लागलं. ही ताकद आज आपल्याकडे आहे. हा देश तुमचा आहे, असा विश्वास या तरुण पिढीमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या युवाशक्तीने पुढे यायला हवे, युवाशक्ती इतिहास घडवू शकते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसैनिकांची ताकद कुठेही कमी होता कामा नये!
युती म्हटली की तडजोड आलीच. 124 जागा मिळाल्या म्हणून काही आनंदी आहेत. पण ज्यांच्या जागा सुटल्या नाहीत त्यांची मी माफी मागतो. पण तुमची ताकद कुठेही कमी होता कामा नये. या युतीसाठी, महाराष्ट्राच्या हितासाठीं प्रत्येक घरात, प्रत्येक खेडय़ात शिवसेना असलीच पाहिजे. वादळात पालापाचोळा उडून जातो. हे तर भगव्याचं वादळ आहे. ही शिवसेनाप्रमुखांची शिवसेना आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उभारी दिली.
सत्ता डोक्यात घुसली तर रस्त्यावरचं कुत्रंही विचारणार नाही
सत्ता येते आणि सत्ता जाते, पण डोक्यात सत्ता घुसली तर रस्त्यावरचं कुत्रंही विचारणार नाही. शिवसेनाप्रमुख सांगायचे, मीपण डोक्यात गेले त्या क्षणी तू शून्य झालास. जनतेसमोर नम्र रहा. मातीशी इमान राख. तुम्ही सर्व साथी सोबती लाभायला, असे सैनिक मिळायला भाग्य लागतं. तेव्हा बाळासाहेबांचा पुत्र म्हणून निर्णय घेतोय. मान्य आहे की नाही, अशी साद उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना घालताच समोरून ‘होय’ असा एकच स्वर आला. अत्यंत प्रामाणिकपणे युतीचं काम करायचं. कोणत्याही परिस्थितीत शिवरायांचा भगवा, महायुतीचा भगवा मंत्रालयावर फडकवायचा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
शिवसेनाप्रमुखांचे विचार ट्रम्पनाही पटले
भूमिपुत्रांच्या न्याय हक्काचा लढा पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. पण काँग्रेस सरकारने तेव्हा मोर्चा काढणाऱया या तरुण शिवसैनिकांचे मोर्चे अडवले. त्यांना अटक केली. पण आज 50 वर्षांनंतर शिवसेनाप्रमुखांचे विचार जगाला पटायला लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भूमिपुत्रांसाठी कायदा केला. आज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात देखील 80 टक्के भूमिपुत्रांना नोकऱया देण्याचे आश्वासन दिले आहे. सत्तेत असताना जे जमलं नाही ते आता स्वतः बेरोजगार झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला पटले आह़े त्यावेळी नोकरीसाठी मोर्चा काढणाऱया मराठी तरुणांच्या तळपायावर लाठय़ा हाणून त्यांना घायाळ करणाऱयांना भूमिपुत्रांच्या रोजगाराबाबत आज कळतंय हे सगळं थोतांड आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
‘हीच ती वेळ, हाच तो क्षण’ हे शिवसेनेचे नवे गीत गाणारे पार्श्वगायक अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, ऍड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार गजानन कीर्तिकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई व विनायक राऊत, आदेश बांदेकर, सूरज चव्हाण, ओबीसी संघटनेचे नेते प्रकाश शेंडगे, माजी खासदार हरीभाऊ राठोड आदी उपस्थित होते.
अबकी बार… शंभर पार – संजय राऊत
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला प्रत्येक जागा जिंकून शिवसेनाप्रमुखांना 100 तोफांची सलामी द्यायची आहे, असे आवाहन करतानाच ‘अबकी बार 100 पार’ अशी घोषणा या वेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. सत्य आणि न्यायासाठी संघर्ष करणारी शिवसेना आता निर्णायक लढय़ासाठी तयार झाली आहे. शिवसेनेच्या विजयाची सुरुवात 24 तारखेला कोकणातून होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच या वेळच्या लढाईत केवळ विजय नाही तर ऐतिहासिक विजय प्राप्त करून महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवूया, असे खासदार राऊत म्हणाले.
80 टक्के नोकऱया भूमिपुत्रांना देण्याचा कायदा करणार – सुभाष देसाई
इतिहासात मराठा वीर सीमोल्लंघन करून दसऱयाचे सोने लुटत असत. शिवसेनाही आता सीमोल्लंघन करून शिवसेनेचे 100पेक्षा जास्त वाघ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात विधानसभेत पाठवेल, असा विश्वास शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी या वेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात व्यक्त केला. महाराष्ट्रातील 80 टक्के नोकऱया भूमिपुत्रांना देण्याचा कायदाही शिवसेना करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. नाराज होऊन शिवसेनेच्या विरोधात उमेदवारी अर्ज केलेल्यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर करून येणाऱया भगव्या शिवशाहीचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
ओबीसींची संपूर्ण ताकद शिवसेनेच्या पाठीशी – प्रकाश शेंडगे
येत्या निवडणुकीत राज्यातील ओबीसी समाजाची संपूर्ण ताकद शिवसेनेच्या पाठीशी उभी करून येत्या 24 तारखेला विजयाचा बेलभंडारा उधळू, अशी ग्वाही या वेळी ओबीसी संघटनेचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली. ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि उद्धव ठाकरे यांनी तसे आश्वासनही दिले आहे, असे सांगतानाच शिवसेनेचा विचार गावखेडय़ांपर्यंत, वाडय़ा-पाडय़ांपर्यंत पोहोचवू, असेही शेंडगे या वेळी म्हणाले. दसरा मेळाव्यात व्यासपीठावर बसण्याचा मान दिल्याबद्दल त्यांनी या वेळी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.
दुष्काळमुक्त, कर्जमुक्त, बेरोजगारीमुक्त महाराष्ट्रासाठी सीमोल्लंघन करूया – बानुगडे-पाटील
महाराष्ट्र ही राष्ट्राची ताकद असून शिवसेना ही महाराष्ट्राची ताकद आहे. दुष्काळमुक्त, कर्जमुक्त, बेरोजगारीमुक्त महाराष्ट्रासाठी सीमोल्लंघन करूया, असे याप्रसंगी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील म्हणाले. मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त शेतकऱयांच्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनाच पहिली धावून गेली होती, असे बानुगडे-पाटील या वेळी म्हणाले. शिवसेनेने रोजगार मेळाव्यातून दोन लाख तर परिवहन खात्याच्या माध्यमातून दीड लाख नोकऱया दिल्या याचीही आठवण त्यांनी करून दिली.
फटकारे
प्रभू श्रीरामांचे अनुकरण करणारी ही शिवसेना आहे. आयुष्यात आम्ही वचनाला जपतो. ‘प्राण जाय पर वचन न जाय’ ही शिवसेनेची वृत्ती आहे.
धनगर बांधवांनी केवळ हाती काठी-घोंगडे बाळगायचे नाही तर तुमच्यावरील अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी या काठीला तलवारीची धार आली पाहिजे.
शिवसैनिक ही माझी तलवार आहे. गोरगरीबांच्या न्यायाचे रक्षण करणारी ही तलवार आहे. अन्याय करणाऱयांचा कोथळा बाहेर काढणारी ही माझी वाघनखे आहेत.
आम्ही जे काही करू ते उघडपणे करू, प्रेमही उघडपणे करू आणि वैरही उघडपणे करू. जे काही केले ते शिवसैनिकांना विचारूनच केले.
शिवसेनेचे संकल्प
10 रुपयांत पोटभर जेवणाची थाळी
एक रुपयात वैद्यकीय चाचण्या
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी बससेवा
300 युनिटपर्यंतच्या वीजदरात
30 टक्के कपात




























































