मतदानादिवशी ‘जयहिंद’चे विद्यार्थी बनणार ‘दिव्यांगदूत’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 राज्यात एकूण 3 लाख 96 हजार 637 दिव्यांग मतदार असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्तांनीच स्पष्ट केले आहे. या मतदारांना मतदान केंद्रावर विशेष सुविधा पुरविण्यात येणार आहे. मात्र या मतदारांसाठी आता महाविद्यालयीन विद्यार्थीही सरसावले आहेत. हे विद्यार्थी आपापल्या भागातील मतदान केंद्रावर जाऊन दिव्यांग मतदारांना मदत करणार आहेत.

दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांनाही सुरळीत मतदान पार पडण्यासाठी मदत करणार आहेत. दरम्यान, शहर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जयहिंदच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच फ्लॅशमॉबचे सादरीकरणही करण्यात आले. यावेळी मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आपण मतदानादिवशी दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना मदत करणार असल्याचे सांगितले. या मतदारांना त्यांचे मतदान केंद्र, त्यांचा बूथ क्रमांक इत्यादी बाबी समजावून सांगणार आहेत. काही अडचणी आल्यास त्या दूर करणार असल्याचेही या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिव्यांगांना मतदानादिवशी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा देण्यात आली आहे. पुणे जिह्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार असून त्याखालोखाल कोल्हापूर आणि सांगलीचा क्रमांक लागतो. हिंगोली जिह्यात सर्वात कमी दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे.