
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली आहे. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर जवळपास तीन महिने ते पद रिक्त होते. त्यावरून इतर पक्षांनी काँग्रेसवर बरीच टीका केली होती.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या या नाट्यावरून हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सोनिया गांधींवर टीका केली आहे. मात्र टीका करताना त्यांची जीभ घसरली असून त्यांनी सोनिया गांधींचा ‘मेलेली चिचुंदरी’ असा उल्लेख केला आहे. हरयाणामध्ये प्रचार रॅलीदरम्यान बोलताना खट्टर यांनी ही टीका केली असून त्यांच्या या असभ्य भाषेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
‘राहुल गांधींना राजीनामा दिल्यानंतर आम्हाला वाटले काँग्रेस घराणेशाहीतून मुक्त झाली. काँग्रेस अध्यक्षपदासाठी ते तीन महिने देशभर फिरले. तब्बल तीन महिन्यानंतर कोण झालं अध्यक्ष? सोनिया गांधी. म्हणजेच काय खोदा पहाड निकली चुहिया. ती पण मेलेली चुहिया. ही काँग्रेसची सध्याची परिस्थिती आहे’, अशा शब्दात खट्टर यांनी सोनिया गांधींवर टीका केली.
खट्टर यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी दिल्ली प्रदेश महिला काँग्रेसकडून खट्टर दिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून खट्टर यांची प्रतिमा देखील जाळली जाणार असल्याचे समजते. या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी करणार आहे.






























































