दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पकडले; दोनजण फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेवासा फाटा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना रविवारी रात्री नेवासा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. जॉकी रमेश चांदणे, राजू अजिज शेख, मुस्तफा गफुर बागवान (सर्व रा.नेवासा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील दरोड्यासाठीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन दोनजण पसार झाले आहेत.

नेवासा फाटा येथे रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक भारत दाते, पोलीस उपनिरीक्षक पी. के. शेवाळे, तपास पथकाचे विठ्ठल गायकवाड, तुळशीराम गीते, सुहास गायकवाड, राहुल यादव यांना रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर- नगर राजमार्गावर पायल हॉटेलजवळ पाच व्यक्ती हातात लाकडी दांडके घेऊन मोटारसायकलसह दरोडा टाकण्याचे उद्देशाने उभे असलेले दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यातील तीनजणांना पकडले. त्यांच्यासोबत असलेले दोनजण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पसार झालेल्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याजवळ असलेली यामाहा मोटारसायकल, लाकडी दांडके व मिरची पूड असे दरोडा टाकण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.या प्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.