
सत्तर वर्षे या देशावर काँग्रेसने राज्य केले. कधी वीस कलमी, कधी चाळीस कलमी कार्यक्रम आणले. गरिबी हटावचा नारा दिला. बैलजोडी, गायवासरू आणि आता पंजावर लोकांची मते घेतली पण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने चुकीची धोरणे राबविली. या देशातील शेतकरी, गोरगरीब, बेरोजगार यांच्यासाठी कोणत्याही योजना आणल्या नाहीत. त्याचेच दुष्परिणाम आजतागायत आपल्याला भोगावे लागत असल्याची टीका केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
काटोल येथे भाजपा व शिवसेना-रिपाई महायुतीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारासाठी आयोजित विराट जाहीरसभेला ते संबोधित करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चरणसिंग ठाकूर, खासदार कृपाल तुमाने, माजी आमदार अशोक मानकर आदी उपस्थित होते.
विधानसभा २०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…
देशातील 85 टक्के जनता ग्रामीण भागात राहात होती, आता 65 टक्के जनता ग्रामीण भागात राहात आहे. शहराकडे या जनतेचा ओढा का वाढला याचा कोणताही विचार काँग्रेसच्या पंतप्रधानांनी आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केला नाही असे गडकरी म्हणाले. तसेच प्रफुल्ल पटेल विमान मंत्री असताना 70 हजार कोटींची विमाने खरेदी केली. खरेच या खरेदीची गरज होती का? यापेक्षा पिण्याच्या पाण्याच्या योजना, सिंचन, जलसंधारणासाठी निधी उपलब्ध करून दिला असता, तर शेतकरी सुखी झाला असता. चुकीच्या नियोजनाचे हे परिणाम आहेत. ही स्थिती बदलणे कठीण आहे, पण अशक्य नसल्याचे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्ष एका विचारावर चालणारा पक्ष असल्याचे सांगताना गडकरी यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रम आणि त्यागामुळे या पक्षाला चांगले दिवस आले. पक्षाने दिलेल्या विचारावर श्रध्दा ठेवून येथे कार्यकर्ता काम करीत असतो, जातीपातीचे राजकारण करीत नाही, असे सांगून चरणसिंग ठाकूर यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन गडकरी यांनी केले.


























































