
>> भरत जोशी, वन्यजीव अभ्यासक
नाशिकला गिधाडांच्या संवर्धनाला यश येते आहे. येथील गिधाड रेस्टॉरंटमध्ये इजिप्शियन गिधाडांची आवक झाली आहे.
निसर्गातील स्वच्छता राखण्यासाठी सातत्याने काम करणारा ‘मोफत कामगार’ म्हणून या पक्ष्याची ओळख सर्वांनाच माहीत आहे. तो म्हणजे गिधाड पक्षी. एखादे मोठे जनावर म्हणजे गाय, म्हैस, रेडा मृत पावल्यावर त्या प्राण्यांचा चट्टामट्टा करण्याचे महत्त्वाचे काम गिधाडे करीत असतात. गिधाडांचे शक्तिमान पंख, मजबूत खांदे आणि बाकदार चोच हे वीरत्वाचे, धाडसाचे लक्षण समजले जाते म्हणून जगभरात त्याच आकर्षणाने पर्यटक आणि पक्षीप्रेमी स्वतःच्या अंगावर गिधाड पक्षाचे ‘टॅटूज’ काढून घेतात.
गिधाडांसाठी रेस्टारंटची कल्पना – गिधाडांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत नाशिक, महाड, नागपूर येथे रेस्टॉरंटस्ची निर्मिती झाली. गोवा सहा वर्षांपासून संयुक्त वन व्यवस्थापन समिती आदिवासी, ग्रामस्थ या सर्वांच्या लोकसहभागातून नाशिकमधील हरसूल तालुक्यातील खोरीपाडा येथील गिधाड संवर्धनासाठी साकारलेल्या ‘गिधाड रेस्टॉरंट’मध्ये गेल्या आठवडय़ात इजिप्तशियन प्रजातीच्या तीन गिधाडांनी हजेरी लावली. गेल्या काही वर्षांत या गिधाडांच्या संख्येत झपाटय़ाने घट होत असून जिल्हय़ात त्याचा अधिवास आढळल्याने संवर्धनाला यश आले आहे.
आदिवासी बांधवांसह वन विभागाचे कर्मचारी गिधाड संवर्धनासाठी प्रयत्न करीत असून पांढऱया पाठीचे आणि लांब चोचीचे या दोन प्रजातींचे सुमारे अडीचशे गिधाडे या रेस्टॉरंटमध्ये येत असल्याचे निरीक्षण आहे. दरम्यान, गेल्या आठवडय़ात पशुधन दगावल्यानंतर मृत्युमुखी पडलेले जनावर रेस्टॉरंटमध्ये टाकले असता इजिप्तशियन गिधाडे तिथे आल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. सुमारे 40 ऑ 40 फूट लांबी-रूंदीचे हे रेस्टॉरंट असून ते अधिक फेनिसिंग लावून सक्षम करण्याच्या दृष्टीने वनविभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. एखादे मृत जनावर रेस्टॉरंटमध्ये आणण्यापूर्वी त्याची पशुवैद्यकीय चाचणी करूनच ती गिधाडांच्या खाद्यासाठी उपलब्ध केली जात आहेत.
गिधाड पक्षी – हा पक्षी कुठल्याही प्रकारचा त्रास न देणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. गिधाड पक्ष्याच्या विविध प्रजाती आढळून येतात. पांढऱया पाठीचे गिधाड, लांब चोचीचे गिधाड, खैरो, टर्की व्हल्चर, ब्लॅक व्हल्चर, कॅलिफोर्निया व्हल्चर, किंग व्हल्चर, इजिप्तशियन गिधाड, यस्ट्रेबिली पक्षी, गिधाड पक्षी हा 33 हजार फुटांपेक्षा वर उंच आकाशात भरारी घेतो म्हणजे माउंट एव्हरेस्टच्याही वर. एवढय़ा उंचावरून तो पृथ्वीतलावरील त्याच्या मृतभक्ष्याच्या शोधात आकाशात घिरटय़ा घालत असतो. एवढय़ा उंचीवर प्राणवायूचे प्रमाण कमी असले तरी गिधाड तग धरू शकणारा, एवढी गगनभरारी घेणारा दुर्मिळ पक्षी आहे. 1973च्या नोंदीनुसार गिधाडाच्या धडकेने आकाशात उडणाऱया विमानांचे खूप नुकसान झाले होते.
गिधाडे नष्ट का होत चालली आहेत?
गिधाडांची संख्या झपाटय़ाने नष्ट होत चालली आहे. हिंदुस्थान, नेपाळ, पाकिस्तान या देशांतील गिधाडांचे प्रमाण कमी होत चाललेले दिसते. गिधाड पक्षी कधीच शिकार करीत नाहीत. गिधाड हे मृतभक्षक वर्गातील पक्षी असून ते प्राण्यांच्या मृतदेहावर जगतात.
विषारी कीटकनाशके, विषारी चाऱयाद्वारे किंवा जनावरांना देण्यात येणाऱया खाद्यामुळे गाई, म्हशी, रेडे, बैल व इतर जनावरे विषबाधेमुळे मृत्युमुखी पडतात आणि त्याचे मांस खाल्यामुळे असंख्य संख्येत गिधाडांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटना काही कमी नाहीत.
इलेक्ट्रिक विजेच्या खांबांवर बसून गिधाड पक्षी गाव, शहरे, शेतीकडील भाग याचा शोध आणि मागोवा घेत असतो. अशा वेळेस विजेच्या तारांचा शॉक लागून गिधाडांच्या मृत्यूचा चढता आलेख पाहायला मिळतो. मावळमध्ये महाड येथे तसेच गडचिरोलीतील गिधाडांच्या संख्येत बरीच घट होऊन गिधाडांच्या काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत ही खूप गांभीर्यपूर्वक विचार करण्याची बाब आहे.
रत्नागिरीमधील दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी गिधाडांची संख्या भरपूर आहे.
गिधाडांचे आयुष्यमान – गिधाडाच्या सात ते आठ प्रजातींचे आयुष्यमान नैसर्गिक वातावरणात आठ ते दहा वर्षे असते किंग व्हल्चरचे आयुष्य सुमारे 30 वर्षे असते.
गिधाडांचे प्रजनन – गिधाड नर-मादी जीवनभर साथ सोडत नाहीत. गिधाडांचे वास्तव्य म्हणजे घरटे उंच डोंगरांच्या कपारीत असते. एका वेळेस मादी पक्षी एकच अंडे देते.
गिधाडे स्वतःची स्वच्छता कशी ठेवतात…
गिधाड हा निसर्गातील स्वच्छता प्रक्रियेतील मोफत कामगार असून त्याचे आवडते भक्ष्य म्हणजे मृतप्राणी. तो गाय, म्हैस, रानरेडा यांच्या कुजलेल्या मांसात आपली दणकट पाय रोवून लांब चोचीने त्या मृतप्राण्यातील मांसाचे तुकडे बाहेर खेचून काढून ते फस्त करीत असतो. हे भक्ष्य खाल्यावर गिधाड त्याचे मूत्र स्वतःच्याच पायावर टाकून कुजलेल्या, घाण वास येणाऱया मांसातील जंतू आणि किडे यापासून स्वतःचे रक्षण करतो.
या उपयुक्त पक्ष्यांना आपण सर्वांनी संरक्षण देऊन या पक्ष्यांचे संवर्धन करून निसर्गातील साखळीतील या महत्त्वाच्या पक्ष्याचे संवर्धन करा. वन विभागाला गिधाड संवर्धन कार्यात मदत करा.


























































