धो-धो पावसात साताऱ्यात पवारांची सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत प्रतिष्ठsची केली आहे. आज येथे त्यांची सभा सुरू असतानाच धो-धो पाऊस कोसळू लागला, पण पवारांनी भाषण न थांबवता भिजतच भाषण केले.

आज सकाळी पंढरपूर, नंतर अंबाजोगाईमध्ये सभा घेतल्यानंतर सायंकाळी पवार साताऱ्यात आले. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन आता भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी पवार आपली ‘पॉवर’ वापरत आहेत. शुक्रवारी शेवटच्या टप्प्यात त्यासाठीच त्यांनी येथे सभा घेतली.

पवार भाषणासाठी उभे राहताच पावसाने जोरदार हजेरी लावली. तरीही त्यांनी भाषण थांबवले नाही तर पावसाचा संदर्भ देत ते म्हणाले, वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. सातारा जिल्हा राज्यात चमत्कार करणार आहे. तो चमत्कार 21 रोजी घडणार आहे. कुस्तीबिस्ती, पैलवानबिलवान हा भाजपवाल्यांच्या तोंडात न शोभणारा विषय आहे अशा शब्दांत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. आपण त्यांना जाहीरपणाने सांगितले की, तुमच्याकडे पैलवान असतील तर मला काही म्हणायचे नाही, पण या भागात आमच्याकडे अनेक उत्तम पैलवान तयार करण्याचे काम करणारे आमचे अनेक सहकारी आहेत. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने कुस्ती नाही असा टोला त्यांनी लगावला. सातारा जिल्हा शिवछत्रपतींचा इतिहास जतन करणारा आहे. तो इतिहास तुम्हाला घडवायचा आहे असे आवाहनही पवार यांनी सातारकरांना केले.