
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी शांत झाली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी धुमधडाक्यात प्रचार केला. उद्या सोमवारी (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर मतदान पार पडणार आहे. सकाळपासून सुरू होणाऱ्या या मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागतील. परंतु अनेक जण मतदार ओळखपत्र नसल्याने संभ्रमावस्थेत आहेत. परंतु काळजी करू नका. कारण फक्त मतदार ओळखपत्रच नाही तर अन्य काही ओळखपत्रही पुरावे म्हणून ग्राह्य धरले जातात.
सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी 11 पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज (पीपीओ), खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.

























































