विवाहबाह्य संबंधातून माकप नेत्याची हत्या, प्रेयसी आणि तिच्या नवऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विवाहबाह्य संबंधातून माकप नेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. 18 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या या नेत्याच्या मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, सुभाषचंद्र डे (58) असं या माकप नेत्याचं नाव आहे. 18 ऑक्टोबरपासून डे बेपत्ता झाले होते. त्यांच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध सुरू केला होता. डे यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन दुब्रजपूर इथलं दाखवत होतं. त्यावरून पोलिसांनी शोध घेतला तेव्हा दुब्रजपूरहून सत्तर किलोमीटर दूर असलेल्या दोन ठिकाणांहून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. मृतदेह दोन तुकड्यांमध्ये कापून ते तुकडे दोन पोत्यांमध्ये भरण्यात आले होते. एक पोतं अजय नदीच्या किनाऱ्यावर आणि दुसरं पोतं जवळच्याच एका शेतात सापडलं होतं.

हा मृतदेह डे यांचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला. तेव्हा तिथे राहणारं एक जोडपं डे यांच्या परिचयाचं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी चौकशी केल्यानंतर जोडप्याने आपला गुन्हा कबूल केला. रेहमान आणि सोनाली बीबी अशी त्यांची नावं आहेत. सोनाली हिचे डे यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते.

18 ऑक्टोबर रोजी डे सोनालीच्या घरी गेले होते. तेव्हा अचानक घरी आलेल्या रेहमान याने त्या दोघांना आपत्तीजनक परिस्थितीत पाहिलं होतं. त्यावरून संतापलेल्या रेहमान याने डे यांच्या डोक्यात लोखंडी सळीने वार केला. त्यामुळे डे यांचा मृत्यू झाला. या हत्येमुळे गडबडून गेलेल्या या दांपत्याने डे यांच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते दोन पोत्यामध्ये भरले आणि ते दोन ठिकाणी फेकून दिले. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.