
>> प्रभाकर पवार
मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा (डिटेक्शन क्राइमब्रँच) अलीकडे भलतीच फॉर्मात आली आहे. सहपोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर सुस्त झालेल्या डिटेक्शन क्राइम ब्रँचला ऊर्जा देण्याचे काम आशुतोष डुंबरे यांनी केले होते. त्यांच्या काळात बऱ्याच स्कॅमवर प्रकाश पडला. गुंतागुंतीच्या केसेस डिटेक्ट झाल्या. तीच परंपरा आता नव्याने मुंबई क्राइम ब्रँचचे सहपोलीस आयुक्त म्हणून चार्ज घेतलेल्या संतोष रस्तोगी यांनी सुरू ठेवली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई, चिमाजी आढाव, निनाद सावंत, सुनील माने, जगदीश साईल, सागर शिवलकर, संजय निकुंबे, दीपक चव्हाण, अशोक खोत, सतीश तावरे, विनायक मेर, अजय जोशी आदी डिटेक्शन क्राइम ब्रँचच्या सर्व युनिट इन्चार्ज व त्यांच्या सहकाऱयांनी गेल्या काही दिवसांत उत्कृष्ट तपास करून सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, उपायुक्त शहाजी उमप, उपायुक्त अकबर पठाण या ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱयांकडून शाबासकी मिळविली आहे. गेल्याच आठवडय़ात मुंबई डिटेक्शन क्राइम ब्रँच युनिट क्र. 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत व त्यांचे सहकारी नितीन पाटील, गजानन भारती, नवनाथ उघडे, मोहसीन पठाण आदी अधिकारी व कर्मचाऱयांनी भायखळा, नागपाडा, लोअर परळ आदी भागांत दवाखाने उघडून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांना अटक केली आहे.
क्राइम ब्रँचने अटक केलेले बोगस डॉक्टर शालान्त परीक्षाही उत्तीर्ण नाहीत. एक आरोपी तर ठार अशिक्षित आहे. त्यांच्या दवाखान्यात दुसऱयांच्या नावाच्या पदव्या व पाटय़ा आढळून आल्या. बरे, हे देशभरात सुरू आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत! ग्रामीण भागात रुग्णांच्या जिवाशी खेळले जात आहे. भाडय़ाच्या गाळय़ात आज कुणीही डॉक्टरचा बोर्ड लावून आपला खाटीकखाना सुरू करतो. अगदी अंगठाछाप लफंगाही! आयुर्वेदाच्या नावाखाली आपल्याकडील भस्म व साबुदाण्याच्या गोळ्या रुग्णांच्या माथी मारतो. याची कुणीही खातरजमा करीत नाही. ना पोलीस, ना ‘एफडीए’, ना एमसीए! त्यामुळे डॉक्टरांकडे औषधांच्या पुडय़ा बांधणारा कंपाऊंडरही आता स्वतःचा दवाखाना उघडून लाखो रुपये कमावत आहे. त्याच्याकडे शिकणारा दुसरा कंपाऊंडरही दुसरी शाखा उघडून तेच काम करतो. कुठली तरी झोपडपट्टी शोधून तेथे आपल्या नावाचा बोर्ड ठोकतो. उच्चभ्रू वस्त्यांमध्येही बोगस डॉक्टरांचा मोठय़ा प्रमाणात सुळसुळाट आहे. अवाच्या सवा भाडे द्यायचे व अत्यंत पॉश Ambiance असलेले क्लिनिक्स उभारून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या एक्झिक्युटिव्ह व व्यावसायिकांना लुटायचे अशी कार्यपद्धती असलेले डॉक्टर मुंबईसारख्या शहरी भागांत आपणास आढळून येतील. क्लिनिकमध्ये लावलेल्या तुमच्या डिग्य्रा खऱ्या आहेत की खोटय़ा आहेत, याची कोण खातरजमा करणार? कुणाला आहे वेळ! जुजबी ज्ञान असलेले लफंगे डॉक्टर असल्याचे बोर्ड लावून प्रॅक्टिस करतात. रुग्णांच्या जिवाशी खेळतात. हे वर्षानुवर्षे सुरू आहे.
डॉक्टर होण्यासाठी जातीचे खोटे प्रमाणपत्र पुरविणाऱ्याही टोळय़ा आहेत. नागपाडा येथून जातीचे बनावट दाखले पुरविणाऱ्या अब्दुल मिर्झा या एम.डी. डॉक्टरला काही वर्षांपूर्वी मुंबई क्राइम ब्रँचच्याच अधिकाऱयांनी अटक केली होती. त्यामुळे मुंबईतील मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणाऱ्या 19 विद्यार्थ्यांना कॉलेजमधून हाकलून देण्यात आले होते. त्यांचे मेडिकल ऍडमिशन रद्द करण्यात आले होते. सीईटी परीक्षेत नापास झालेले विद्यार्थी पूर्वी जातीचे बनावट प्रमाणपत्र न्यायालयात दाखल करून मेडिकलला ऍडमिशन मिळवायचे आणि डॉक्टर व्हायचे. मग असे विद्यार्थी रुग्णांचे रक्त शोषणार नाही तर काय करणार?
तारांकित रुग्णालये चालविणारे कोण आहेत? त्यांच्यावर आज कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात आज रुग्णांना हवे तसे लुटले जाते. रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना रस्त्यावर आणले जाते. एजंटना लाखो, करोडो रुपये देऊन ऍडमिशन मिळविलेल्या व डॉक्टर झालेल्यांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? सामान्य व गरीब रुग्णांना सरकारी रुग्णालयांत वैद्यकीय सेवा नीट मिळत नाही. त्यांना उपचाराविना आपला जीव गमवावा लागतो म्हणून गावातील, शहरातील झोपडपट्टीत बोर्ड लावून बसलेल्या व पाच-पन्नास रुपये घेणाऱ्या बोगस डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते. त्यात काहींचा जरी जीव जात असला तरी काहींना रिलीफही मिळतो. बोगस डॉक्टर नसतील तर सारा समतोलच बिघडून जाईल असेही सांगितले जाते. बडय़ा डॉक्टरांची हजार-पाचशे रुपये फी गरीबांना परवडत नाही. वैद्यकीय व्यवसाय आज बडय़ा पैसेवाल्या ‘धेंडां’नी ताब्यात घेतला आहे. आज गरीबांची जनसामान्यांची प्रामाणिक मुले आपणास वैद्यकीय व्यवसायात कमी दिसतील; परंतु मुंबईसारख्या शहरात स्कॅम करून श्रीमंत झालेल्या लफंग्यांची डॉक्टर झालेली पोरं अधिक दिसतील अशी सद्यस्थिती आहे. कुणीही चांगले डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार होत नाहीत. याला जबाबदार राज्यकर्तेच आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांना राहण्याची व त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची चांगली सोय नसते. रुग्णालयांची अवस्थाही तेथे अत्यंत वाईट असते. कोणत्याही सुविधा व यंत्रणा रुग्णालयात नसतात, मग तुम्हाला ग्रामीण भागात कसे दिसतील प्रामाणिक डॉक्टर! का नाही याचा भामटे फायदा घेणार! आपल्या देशातच शासकीय वैद्यकीय सेवा नाकाम आहे. इतर देशांत लोकांच्या आरोग्याला शासन प्राधान्य देते. त्यांना वैद्यकीय सुविधा दिल्या जातात. याच्या उलट आपल्या देशात आहे. वैद्यकीय सेवेची दुरवस्था आहे. गंभीर जखमी झालेली व्यक्ती वाहतुकीच्या कोंडीमुळे रुग्णालयात जिवंत पोहोचतच नाही. जे पोहोचतात ते नशीबवान असतात. बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त राज्यकर्त्यांनी, पोलिसांनी जरूर करावा. तत्पूर्वी, वैद्यकीय सेवाही सुधारावी. महापालिका व सरकार रुग्णालये बांधते; परंतु चांगले डॉक्टर व सुविधांचे (अत्याधुनिक यंत्रणा) काय? गरीबातील गरीबही आज शासकीय रुग्णालयात पाय ठेवायला मागत नाही. मग का नाही झटपट श्रीमंत होण्यासाठी खासगी खाटीक वाढणार! बोगस डॉक्टरांचे जर समूळ उच्चाटन करायचे असेल तर आता नॅशनल मेडिकल कौन्सिल व राज्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. ‘मोक्का’सारखा कडक कायदा अमलात आणून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱयांना जेलमध्ये टाकले पाहिजे. तरच बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट थांबेल!




























































