
प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने तळ्यात बुडवून त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट पत्नीने रचला. त्यासाठी प्रियकराची मदतही घेतली. पण पतीने जाता जाता त्यालाही बुडवला आणि स्वत:ही पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील सूरत शहरात घडली आहे. कमल असे पतीचे नाव असून खुशी असे त्याच्या पत्नीचे आणि तुषार असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी खुशीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान याआधीही पतीला ठार मारण्याचा प्रयत्न खुशीने केला होता. पण तो यशस्वी झाला नव्हता.
सूरत येथे राहणाऱ्या कमलचे (35) लग्न खुशी (29) नावाच्या महिलेबरोबर झाले होते. त्यांना एक मुलगीही आहे. खुशी शाळेत शिक्षिका होती. तर कमल इलेक्ट्रीशियन होता. दोघांचे बरे चालले होते. मात्र वर्षभरापूर्वी खुशीची ओळख बँकेत शिपाई असलेल्या तुषारबरोबर झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. कमलला संशय़ आल्याने तो खुशीची सतत चौकशी करू लागला. त्यामुळे खुशी चिडली होती. तिला तुषारबरोबर कायमचे राहायचे होते. त्यामुळे तिने कमलचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिला तुषारनेही मदत केली. नंतर दोघांनी प्लान तयार केला. प्लानप्रमाणे खुशीने मुलीला नातेवाईकांच्या घरी ठेवले. त्यानंतर तिने कमलला कंतारा गावाजवळील तळ्याजवळ बोलावले. तेथून आपण मुलीला घ्यायला जाऊ असे तिने त्याला सांगितले. यामुळे कमल बाईकवरुन तळ्याजवळ आला व खुशीची वाट पाहू लागला. पण खुशीने शौचालयाला जात असल्याचे त्याला सांगितले व ती तळ्यापासून काही अंतरावर असलेल्या मंदिराजवळ लपली. कमल मात्र तळ्याजवळ तिची वाट पाहात होता. पण थोड्याच वेळात तिथे तुषार आला व त्याने कमलला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तुषारने कमलला तळ्यात ढकलले. पण यावेळी झटापटीत तुषारची कॉलर कमलच्या हातात आली. त्यामुळे कमलने तुषारची कॉलर घट्ट पकडून ठेवली. दोघांनाही पोहता येत नसल्याने काहीवेळातच दोघे पाण्यात बुडाले.
हे पाहताच खुशीने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर काहीजणांनी तळ्यात उड्या टाकून कमल व तुषारचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी खुशीला अटक केली आहे. पोलीस तपासात खुशीने गुन्ह्याची कबुली दिली असून याआधीही कमलला तळ्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. पण तुषार उशीरा आल्याने प्लान फसल्याचे पोलिसांना सांगितले.




























































