लेख – सावरकरांचे हिंदुत्व आणि विरोधक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. वि. वा. देशपांडे

भूमीबद्दलची निष्ठा हा सावरकरांच्या दृष्टीने मुख्य निकष आहे. म्हणून व्याख्येत ‘पुण्यभू’ शब्द घातला आहे. जो या भूमीस माता मानून वंदन करावयास तयार नाही तो हिंदू असू शकत नाही. हिंदुस्थानला बगीचा आणि स्वतःस बुलबुल पक्षी मानणारा भोगवाद त्यांना मान्य नव्हता. ‘गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे’ ही त्यांची राष्ट्रभक्ती होती, वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदे मातरम् हे त्यांना मान्य होते, धर्म बदलल्यावर प्रियकर हिंदीस्थान मानून आपल्या पितरांना नाकारणे, केवळ मक्केस पवित्र मानून प्रार्थना करणे त्यांना राष्ट्रांतर वाटले. 

‘महात्म्याची दुसरी हत्या’ या डॉ. राम पुनियानी यांच्या ग्रंथाचे परीक्षण मल्हार गोखले (‘सामना’ दि. 29 सप्टें.) यांनी करताना म्हटले आहे की, स्वतः हिंदू असणारे, पण हिंदुत्वाच्या शत्रूच्या प्रेरणेने हिंदुत्वास विरोध करणारे लेखक उच्च बौद्धिकतेचा आव आणून आपल्या सिद्धांतांची किती सफाईदार मांडणी करतात याचा नमुना म्हणून पुस्तक वाचनीय आहे. खरे तर त्यांना अन् त्यांच्यासारख्या अनेकांना सावरकरांचे हिंदुत्व समजलेच नाही. म्हणून ते स्पष्ट करण्याचा माझा हा प्रयत्न आहे.

‘हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा राष्ट्रवाद’ हे पुस्तक रावसाहेब कसबे यांनी लिहिले असून त्यात ते म्हणतात : ‘सावरकर आणि जीना’ दोघेही द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करत होते. कारण ब्रिटिश हिंदुस्थानातून गेले तर येणार्‍या स्वातंत्र्यात आपल्या समाजाचे निश्चित स्थान काय असेल यासंबंधीची भीती त्यांच्या मनात सतत ग्रासत होती (पृ. 527). जीनांना भीती भासण्याचे कारण नव्हते. कारण 1940 लाच गांधींनी हे स्पष्ट केले होते. की, ‘आठ कोटी मुसलमानांना उर्वरित हिंदुस्थानच्या इच्छेपुढे मान तुकवावयास लावण्याचा कोणताही अहिंसक मार्ग मला माहीत नाही, मग उर्वरित हिंदुस्थानची बहुसंख्या केवढीही शक्तीशाली असो’ (हिंदू-मुसलमान ऐक्य : भ्रम आणि सत्य, ले. ब. ना. जोग, पृ. 351). 28 मे 1943 ला सावरकरांचा एकसष्टीचा कार्यक्रम नागपूरला न. चिं. केळकरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी ‘हिंदू व मुसलमान ही दोन भिन्न राष्ट्रे आहेत’ या जीनांच्या मताबद्दल सावरकर म्हणाले  : होय, ही दोन राष्ट्रे आहेत हे ऐतिहासिक सत्यच आहे व हे गृहीत धरूनच हिंदूंनी आपली स्वतंत्र संघटना करण्याच्या उद्योगास लागले पाहिजे. हिंदुस्थानचे दोन तुकडे पाडले पाहिजेत असा याचा अर्थ होत नाही. जर्मनीत किंवा ग्रेट ब्रिटनमध्ये अशी भिन्न भिन्न राष्ट्रके एकाच सामान्य राज्यतंत्राचे घटक म्हणून नांदू शकतात, तसे आम्हालाही हिंदुस्थानात का नांदता येऊ नये? इंग्रजांनी युद्ध जिंकले तर स्वतःच्याच हिताच्या दृष्टीने त्यांना मनात असो वा नसो, पण हिंदुस्थानला राजकीय अधिकार द्यावेच लागतील. हिंदू महासभेच्या प्रचारामुळे आज सैन्यात 60 टक्के हिंदूंची भरती झाली आहे. युद्ध समाप्तीनंतर उद्या हे सैन्य परत आल्यावर राजकीय घटनेत हिंदूंचेच वर्चस्व प्रस्थापित होईल. यात केवळ आशावाद नसून वास्तवावर आधारलेले धोरण आहे. भीतीचा शब्द नाही ‘Vivisect me before you vivisect India’ असे म्हणणारे गांधी पुढे बदलतात. 27 ऑगस्ट 1946 च्या टिपणात व्हेव्हेल म्हणतात ‘Gandhi said that if a blood bath was necessary, it would come about in spite of non-violence. I said that I was very shocked to hear such words from him.

प्रश्न असा पडतो की, blood bath टाळण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी तो आवश्यक असल्याची शक्यता वारंवार ते का बोलून दाखवत होते? ज्या जीनांनी खिलाफत आंदोलनास विरोध केला, ते जीना गांधींनी काँग्रेस आंदोलनात खिलाफत आणल्यावर दूर गेले. नंतर गांधींनी त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला तो आधी करणे आवश्यक होते. पाकिस्तान म्हणजे लोकसंख्येची अदलाबदल हा मुद्दा मांडला असता तर मुसलमान समाज पाकिस्तान निर्मितीस तयार झाला नसता, निदान मुस्लिमांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्याकांडावर शासकीय नियंत्रण ठेवणे शक्य झाले असते. आपल्याच मार्गाने स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे मानणारे गांधी होते. त्यांची असहिष्णुता त्यांच्या अनुयायींना वारसा म्हणून देऊन गेले. पण स्वसंरक्षणास गांधीवाद्यांना सेना सांभाळावी लागली व गांधीजींची (अर्थात त्यांच्या विचारांची) हत्या झाली असे वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यास मोदी सरकारपेक्षा काँग्रेस सरकारच जबाबदार आहे.

‘अक्षर’ दिवाळी 2008 च्या अंकात राम पुनियानी म्हणतात : ‘या हिंदुत्ववादी मंडळींच्या सिद्धांतानुसार हिंदू हा प्रथम हिंदू असून नंतर भारतीय. या कडव्या भूमिकेतून पुढे हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.’ त्यांच्या लेखात मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली, खिलाफत चळवळ, मोपला बंड, स्वामी श्रद्धानंदाचा खून, भगत सिंग आणि कराची काँग्रेस अधिवेशन यांचा साधा उल्लेख नाही. त्यांचा आक्षेप काय? हे लोक सर्वसामान्य जणांना धर्माच्या रक्षणासाठी तयार राहण्याचे आवाहन करतात. पण ही पाळी हिंदू नेत्यांवर का यावी? राज्यघटनेत धर्माची व्याख्या नाही याचा विचारच नाही.

‘हिंदुत्वदर्शन’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. द. न. गोखले म्हणतात : सावरकरांचा हिंदुत्ववाद आध्यात्मिक अथवा पारमार्थिक नव्हता. तो अगदी अहिक होता. हिंदुत्वाकडे ते इहवादी दृष्टीने नि त्यातही समाजशास्त्रिय दृष्टीने बघत. हिंदू धर्म हा त्यांच्या हिंदुत्वातील एक घटक होता, एकमेव घटक नव्हता. ते हिंदू धर्मावरून हिंदू कोण हे ठरवत नव्हते, तर हिंदूंचा जो धर्म तो हिंदू धर्म असे म्हणत होते (पृ. 17). डॉ. अरविंद गोडबोले यांनी म्हटले आहे : सावरकरांची हिंदूंची कल्पना भूमीवाचक आहे. हिंदुत्व आणि हिंदू धर्म यातील फरक सावरकरांनी स्पष्ट केला आहे (सावरकर विचारदर्शन पृ. 33). वेदांवर विश्वास न ठेवणाराही हिंदू असतो हे त्यांनी मान्य करून लोकमान्यांपुढे एक पाऊल टाकले. वैदिक, बौद्ध, जैन, शीख यांना व भारतीय संप्रदायांना सामावणारी आणि इस्लाम, ख्रिस्ती, पारशी व यहुदींना वगळणारी हिंदूंची कायदेशीर व्याख्या त्यांच्या व्याख्येवर आधारलेली आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वास जीवन पद्धती मानले. भूमीबद्दलची निष्ठा हा सावरकरांच्या दृष्टीने मुख्य निकष आहे. म्हणून व्याख्येत ‘पुण्यभू’ शब्द घातला आहे. जो या भूमीस माता मानून वंदन करावयास तयार नाही तो हिंदू असू शकत नाही. हिंदुस्थानला बगीचा आणि स्वतःस बुलबुल पक्षी मानणारा भोगवाद त्यांना मान्य नव्हता. ‘गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे’ ही त्यांची राष्ट्रभक्ती होती, वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदे मातरम् हे त्यांना मान्य होते, धर्म बदलल्यावर प्रियकर हिंदीस्थान मानून आपल्या पितरांना नाकारणे, केवळ मक्केस पवित्र मानून प्रार्थना करणे त्यांना राष्ट्रांतर वाटले. 1935 च्या कायद्याने सिंधला मुस्लिमबहुल प्रांताचा दर्जा देणे फाळणीची पेरणी करण्यासारखे त्यांना वाटले आणि याल तर तुमच्यासह हे त्यांनी मुस्लिमांना आवाहन केले. जीनाने ते मानलेही असते, पण गांधींनी त्यांना काँग्रेस सोडावयास लावल्याने ते गांधीविरोधी होऊन सूडाने पेटून उठले होते. द्रौपदीसारखी भारतमातेची विटंबना झाली. रक्ताचे पाट वाहिले, अहिंसा अतिरेकाची ही फलश्रुती होती. यावरून काय बोध घेणार?

(1) जात्यंध लोकांवर राष्ट्रनिष्ठ समाजाने वचक ठेवणे आवश्यक असते. सलमान रश्दीच्या पुस्तकावर इंग्लंडने बंदी घातली नाही. उलट ब्रिटनचे तत्कालीन गृहमंत्री जॉन पॅटन यांनी पत्रक काढून स्पष्ट केले की, ब्रिटनमध्ये राहावयाचे असेल तर येथील कायदे पाळावेच लागतील.

(2) जेव्हा बहुसंख्याकांचा धर्म राष्ट्रधर्मास आधार देतो तेव्हा इतर धर्मीयांनी त्याच्याशी जमवून घ्यावे. मधू लिमये यांनी Independent च्या 24-08-1992 च्या अंकात हे मांडले की, ‘युनायटेड किंगडमच्या राणीला चर्चचे प्रमुख स्थान असले तरी ते सेक्युलर लोकशाहीवादी राष्ट्र आहे.’ राष्ट्राच्या संस्कृतीशी धर्म निगडित आहे.

(3) काळानुसार सांस्कृतिक बदल होतात. हा देश कृषीप्रधान असल्याने गोपूजेऐवजी गोरक्षणास महत्त्व आले आहे.