मध्य रेल्वेचे ऐन दिवाळीत ‘संडे टाइमटेबल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने येत्या रविवारी दिवाळीच्या सणामुळे दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱया ‘मेगा ब्लॉक’ला सुट्टी दिली आहे. मात्र दिवाळीच्या सुट्टीनिमित्त रविवारी आणि सोमवारी रविवारचे वेळापत्रक चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘मेगाब्लॉक’ जरी नसला तरी कमीच लोकल फेऱया चालविण्यात येणार असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेने दर रविवारी देखभाल-दुरुस्तीसाठी घेण्यात येणारा मेगाब्लॉक येत्या रविवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन असल्याने रविवारचा मेगाब्लॉक नसेल, मात्र सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्याने रविवारी आणि सोमवारी कमी लोकल फेऱया म्हणजे ‘संडे टाइमटेबल’ चालविण्याचा निर्णय घेतल्याने ऐन सणासुदीत लक्ष्मीपूजन आणि पाडव्यालाही मध्य रेल्वेच्या लोकलला गर्दी असणार आहे.

केवळ 1350 लोकल फेऱया

मध्य रेल्वेवर दररोज एकूण 1774 फेऱया चालविल्या जातात. रविवारी संडे टाईमटेबलमुळे त्यापैकी 20 टक्के फेऱया रद्द केल्या जातात. म्हणजेच 1350 फेऱया चालविण्यात येतील. एरव्ही रविवारच्या मेगाब्लॉकमध्ये आणखीन 200 फेऱया रद्द केल्या जात असतात. रविवारी व सोमवारी संडे टाईमटेबलमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना ऐन दिवाळीत गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

पश्चिम रेल्वेचाही दिवसाचा ब्लॉक रद्द
पश्चिम रेल्वेनेही या रविवार, 27 ऑक्टोबर रोजी दिवसाचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. मात्र शनिवार, 27 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत अंधेरी आणि बोरिवलीच्या अप जलद मार्गावर तर मध्यरात्री 12.30 ते 4.20 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र रविवारी लोकल फेऱया नेहमीप्रमाणे धावतील असे म्हटले जात आहे.