
>> विवेक दिगंबर वैद्य
‘सद्गुरूंवर किती टोकाचे प्रेम करता येते’ हे जगाला दाखवून देणाऱया ‘श्रीनामदेव महाराज’ नावाच्या अवलियाचा हा परिचय.
श्री स्वामी समर्थ संप्रदायामधील सिद्धपुरुष श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर यांचे सेवेकरी ते पुढे त्यांची परंपरा चालवणारे थोर सत्पुरुष असा श्रीनामदेव महाराज केळकर यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सद्गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ मानणारे आणि त्यांच्या सेवेमध्ये संपूर्ण आयुष्य झोकून देणारे, सोबत दास्यभक्तीचे ज्वलंत उदाहरण स्थापित करणारे श्रीनामदेव महाराज हे अवलिया वृत्तीचे साधुपुरुष होते.
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील ‘भडे’ गावी 1900 साली श्रीनामदेव महाराजांचा जन्म झाला. मूळचे गोव्याचे असलेले केळकर कुटुंब तत्कालीन धार्मिक अराजकतेला कंटाळून ‘भालावली’ येथे कायमचे स्थायिक झाले. या कुटुंबात बाळाजी मोरेश्वर केळकर नावाचे उदारवृत्तीने राहणारे सत्पुरुष झाले. पुढील पिढीचे गोपाळराव केळकर गावचे पोलीसपाटील होते. सत्शील स्वभावामुळे आणि निःस्पृहतेमुळे त्यांचा गावात सात्त्विक दरारा होता. त्यांच्या सात मुलांपैकी एक ‘तुकाराम’ हे भगवद्भ्कत असून देवधर्म व तीर्थयात्रांची आवड असणारे होते. त्यांच्या पोटी श्रीनामदेव महाराजांचा जन्म झाला, मात्र दुर्दैवाने बाळाला वडिलांचे प्रेम फारसे लाभले नाही. नाशिक येथे तीर्थयात्रेसाठी गेलेले वडील व आजोबा प्लेगच्या साथीचे बळी ठरले आणि लहानगा नामदेव पोरका झाला. देवभोळ्या माऊलीच्या संस्कारात वाढलेला नामदेव ‘भालावली’ येथे केवळ तीन इयत्ता शाळा असल्यामुळे तितकेच शिकला. त्याला बालपणापासूनच देवभक्तीचे वेड होते.
प्रपंच चालवण्यासाठी परमार्थ उपयोगास येत नाही आणि पोटापाण्यासाठी व्यवसाय करावा लागतो हे न कळणाऱया वयात नामदेवला मुंबई गाठावी लागली. वयाच्या तेराव्या वर्षी मुंबईत आलेल्या नामदेवने गिरगावमधील माधवबाग परिसरात ‘टोपी’ बनविणाऱया गंगाराम वालावलकर यांच्याकडे नोकरी पत्करली. त्याकाळी प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पद्धतीची टोपी परिधान करीत असे. त्यामुळे ‘टोप्या’ बनविण्याचा धंदा तेजीत होता. नामदेवही अल्पावधीतच टोप्या बनविण्याचे कसब शिकला आणि काही दिवसांतच निष्णात कारागीर म्हणून नावलौकिक कमावता झाला. श्रीमंत मोतीरामशेठ (टोपीवाले देसाई) यांना नामदेवने बनवलेली कलाकुसरीची टोपी इतकी आवडली की त्यांनी शाबासकी आणि भरघोस बिदागी देऊन नामदेवचे कौतुक केले. पुढे अंगभूत हुशारीच्या जोरावर नामदेवने गिरगावच्या फणसवाडीत श्रीव्यंकटेश मंदिराजवळ टोप्या बनवण्याचा स्वतःचा कारखाना सुरू केला. कोकणातील कलाकार वृत्तीचा कारागीर आता ‘मालक’ झाला.
तरुण वयात आणि ऐन उमेदीत पैसा व मानमरातब यांची चव चाखल्यानंतर मात्र अवघ्या पंचविशीत नामदेवला विरक्ती खुणावू लागली आणि अचानक एकेदिवशी त्याने आपला बरकतीस आलेला उद्योग बंद केला. आजवर मिळवलेला पैसा गोरगरीब गरजूंना आणि घरच्यांना दिला आणि फकिरासारखे निर्विकार आयुष्य तो जगू लागला. दरम्यान, नावापुरता चाललेला लग्नसंसारही क्षुल्लकशा कारणांवरून मोडून पडला तेव्हा सद्गुरूंच्या शोधार्थ तळमळणाऱया नामदेवाला दशदिशा मोकळ्या झाल्या. कसलेही पाश न राहिलेल्या अवस्थेत नामदेव गाणगापुरास आला. तिथे त्यास श्रीनृसिंह सरस्वतींनी शेतकऱयाच्या वेशात येऊन पादुकांचे दर्शन घडवले. मन वरकरणी शांत झाले तरी चित्त भरकटत होते. त्याच संभ्रमावस्थेत नामदेव चालत अक्कलकोट येथे आला आणि श्रीस्वामीरायांच्या चरणी सद्गुरूप्राप्तीसाठी आळवणी करू लागला. स्वामीमाऊलीने उत्तर देण्याकरिता अधिक वेळ खर्च न करताच पहाटे रामप्रहरी नामदेवास स्वप्नदृष्टांताद्वारे स्पष्ट आदेश दिला. ‘इथे थांबू नकोस, तुझा गुरू तुझ्यापाशी आहे तेव्हा मुंबईस जा’. दिवस उजाडताच नामदेव अक्कलकोटहून मुंबईस परतला.
सद्गुरू मुंबईत असले तरीही ते नेमके कोण असावेत? याचा शोध घेणे गरजेचे होते. मुंबईस येताच आपल्या तीर्थयात्रेचे वृत्त कानावर घालण्यासाठी नामदेव त्याच्या एकनाथ नावाच्या बंधूंकडे आला. त्याचे बोलणे ऐकून एकनाथरावांनी दुसऱया दिवशी नामदेवास आपल्यासोबत प्रभादेवी येथे नेले. तेथे एक सिद्धसत्पुरुष ‘श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर’ ही लौकिक खूण धारण करून राहत होते. नामदेव बंधूसह प्रभादेवीस आले, मात्र त्यांना पाहून श्रीजांभेकर महाराजांनी तोंड वळवले व ते पाठमोरे बसले. श्रीजांभेकर महाराजांची ही कृती जरी विचित्र असली तरीदेखील नामदेवाच्या ‘अंतरीची खूण’ त्याच्या अंतर्मनाला आपण योग्य त्या पत्त्यावर पोहोचल्याची ग्वाही देती झाली.
दुसऱया दिवशी नामदेव पुन्हा श्रीजांभेकर महाराजांपाशी आला तेव्हा श्रीमहाराजांनी त्याला गुरुचरित्राचा सप्ताह करण्यास सांगितले. पुढे असे सात सप्ताह पूर्ण झाले आणि त्याचे फलित म्हणून श्रीमहाराजांनी नामदेवास आपल्या अंतरंगात सामावून घेतले, सोबत राहू दिले. मात्र या पुढील काळ कसोटीचा होता. नामदेव सहवासात आल्यापासून त्याची कठोर परीक्षा घेण्यास श्रीजांभेकर महाराजांनी प्रारंभ केला. पितृघट व्रत करणे, स्त्र्ायांच्या विटाळाची लुगडी धुणे अशी अनेक अकल्पित आणि अनाकलनीय कामे करून घेतली. तोंडातून चकार शब्द न काढणारा नामदेव या कठोर चाचणीत सरस व अव्वल ठरला तेव्हा श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर यांनी स्वतःचे सर्वस्व नामदेव मध्ये ओतले आणि 1940 साली देह त्यागला. नामदेवचा ‘श्रीनामदेव महाराज’ करणारे सद्गुरू सगुणदेहातून नाहीसे झाल्याने सैरभैर झालेल्या श्रीनामदेवांमध्ये पुन्हा विमनस्कपणा दाटून आला. मनःशांतीसाठी ते अक्कलकोट येथे गेले. तेव्हा त्यांना श्रीस्वामीरायांच्या साक्षीने श्रीजांभेकर महाराजांनी ‘आपल्या समाधीस्थानी जाण्यास व तिथेच कायम राहण्यास’ सांगितले. त्याचे कारण पुढे लगेचच कळून आले.
श्रीजांभेकर महाराजांच्या समाधीचे रक्षण करणे हा श्रीनामदेव महाराजांच्या सेवाकार्यातील सर्वात खडतर व अंत पाहणारा काळ होता. विपरीत परिस्थितीतही स्थिर, अविचल राहून श्रीनामदेव महाराजांनी सद्गुरूंच्या समाधीचे रक्षण केले आणि त्याच समाधी मंदिरात ‘नामदेवाच्या’ पायरीवर मार्गशीर्ष शुद्ध पंचमीचा योग साधून 15 डिसेंबर 1958 रोजी श्रीनामदेव महाराज आपल्या सद्गुरूंच्या अंतरंगात कायमस्वरूपी मिसळून गेले. त्यांनी अनेक लीला केल्या, अनेकांचा उद्धार केला आणि ते सद्गुरूपदापर्यंत पोहोचले तरीही त्यांचे स्मरण होते ते त्यांच्या प्रखर दास्यभक्तीमुळे.






























































