
बुकीशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यामुळे बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकीब अल हसनचा पाय खोलात गेला आहे. शाकीब अल हसनने दोन वर्षांपूर्वी दूरध्वनीवर बुकीशी संभाषण केल्याचे आयसीसीच्या करप्शन युनिटने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. मात्र तीन वेळा बुकींनी संपर्क साधल्यानंतरही याबाबतची माहिती बांगलादेशच्या या क्रिकेटपटूने आयसीसी किंवा बांगलादेश क्रिकेट बोर्डापैकी कोणत्याही प्रतिनिधीला दिली नाही. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने शाकीब अल हसनवर दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे हिंदुस्थान दौऱ्यावर निघालेल्या बांगलादेशला धक्का बसला आहे. शाकीब अल हसन यामुळे आता आगामी हिंदुस्थान दौऱ्यासह आयपीएल व पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपलाही मुकेल.
चूक मान्य केली
बुकीकडून फिक्सिंगबाबत ऑफर मिळतात प्रोटोकॉलनुसार शाकीब अल हसनने आयसीसीशी संपर्क साधायला हवा होता, पण त्याने तसे केले नाही. बंदीच्या शिक्षेनंतर शाकीब अल हसन म्हणाला, ज्या खेळावर माझे प्रेम आहे त्यापासून थोडा वेळ दूर राहणार आहे. ही बाब निराशाजनक आहे. पण मी चूक केली असून बंदीची शिक्षा मान्य आहे.
सरावापासूनही दूर
बांगलादेशचा संघ बुधवारी हिंदुस्थान दौऱ्यावर रवाना होणार आहे. पण त्याआधी मीरपूर येथे झालेल्या सराव शिबिरात शाकीब अल हसनला वगळण्यात आले होते. टीम मीटिंगपासूनही तो दूर होता. आता त्याच्या अनुपस्थितीत मुशफिकर रहीमच्या खांद्यावर कसोटीच्या आणि महमुद्दूलाह किंवा मोसादेक होसैन यांच्यापैकी एकाच्या खांद्यावर ट्वेंटी-20 संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात येऊ शकते. यावेळी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजमुल हसन यांनीही शाकीब अल हसन याच्या वृत्तीवर टीका केली.




















































