
इक्बाल मिर्चीशी संबंधित आर्थिक घोटाळा प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा आज बुधवारी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात हजर झाला. यावेळी त्याची कसून चौकशी करण्यात आली. आपण मिर्चीला कधीच भेटलो नाही असे सांगत कुंद्राने आपल्यावरील सर्व आरोप चौकशीदरम्यान फेटाळून लावले.या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱयांना जी मदत लागेल ती करायला तयार आहे. सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी आपण तयार असल्याचे कुंद्रा यांनी सांगितले.
उद्योजक रणजीतसिंह बिंद्राच्या चौकशीत कुंद्राचे नाव समोर आले होते. बिंद्राला तीन आठवडय़ांपूर्वी अटक करण्यात आली होती. इक्बाल मिर्चीच्या तब्बल 225 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा व्यवहार बिंद्राने केला होता असा ईडीचा दावा आहे. बिंद्राने इसेंशल हॉस्पिटॅलिटी नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली होती. या कंपनीची संचालक शिल्पा शेट्टी आहे. बिंद्राची रियल इस्टेट कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या चौकशीदरम्यान इसेंशल हॉस्पिटल लिमिटेड कंपनीतही त्याने गुंतवणूक केल्याचे समोर आले होते.


























































