
प्रतिकुल वातावरणावर मात करीत शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेली पिके व फळबागा परतीच्या पावसाच्या दणक्याने उद्ध्वस्त झाल्या, यामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिह्यात 7 लाख 40 हजार हेक्टरपैकी 3 लाख 26 हजार हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लागवडीखालील क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रातील पिकांची दाणादाण उडाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. परतीच्या पावसामुळे 1621 गावे बाधीत झाली असून, नुकसानग्रस्त शेतकऱयांची संख्या 4 लाख 56 हजार 931 इतकी आहे.
परतीच्या पावसाने पंधरा दिवस उलटले तरी मुक्काम कायम ठेवल्याने शेतांमध्ये पाणी साचले आहे, त्यामुळे उभ्या पिकांची नासाडी झाली. सर्वाधिक नुकसान जिह्यातील पूर्व व मध्य भागात झाले असून, पावसाचा सर्वाधिक फटका सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर व देवळा या तालुक्यांना बसला आहे.
जिह्यातील लागवडीखालील 7 लाख 40 हजार हेक्टरपैकी 3 लाख 26 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान मका पिकाचे झाले. 2 लाख 25 हजार हेक्टरपैकी 70 टक्के क्षेत्रावरील मक्याची नासाडी झाली. काढणीला आलेल्या मका, सोयाबीन यांची दाणादाण उडाली, त्यांना कोंब फुटल्याने पूर्ण हंगामच वाया गेला आहे.

























































