घे भरारी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीवनी धुरी-जाधव

साताऱ्याचे कॅप्टन अमोल यादव. त्यांनी छोटय़ा शहरांना जोडण्यासाठी एक सहा आसनी विमान तयार करण्याचे ध्येय बाळगलं. नुकतेच त्यांनी बनवलेल्या विमानाच्या चाचणीला डीजीसीएकडून हिरवा कंदील मिळाला त्यामुळे त्यांच्या विमान उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अखेर त्यांच्या एकोणीस वर्षांच्या खडतर प्रवासाला यश मिळालं. प्रचंड जिद्द आणि अफाट इच्छाशक्तीच्या बळावर सगळं काही शक्य आहे. बऱयाच वर्षांपासून हिंदुस्थानी बनावटीचे विमान तयार करण्याच्या प्रयत्नात असलेले अमोल यादव जेव्हा अमेरिकेला फ्लाईट ट्रेनिंगसाठी गेले त्यावेळी त्यांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी मिळून एक लहान विमान विकत घेतले. तेव्हा ते एकोणीस वर्षांचे होते. त्या विमानावरच त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्या विमानाची मेंटेनन्स प्रक्रिया ते स्वतः पाहत असल्यामुळे त्यांच्या लक्षात आले की, ते असे विमान बनवू शकतात. त्यामुळे अमेरिकेतून हिंदुस्थानात आल्यावर त्यांना स्वतःचे विमान हवे होते. तसे विमान आपल्या इथे शोधायला सुरुवात केली. शोध घेत असताना त्यांना कळलं की, हिंदुस्थानात विमानं तयार केली जात नाहीत आणि त्यावेळी त्यांनी निश्चय केला, हिंदुस्थानात विमाने बनवली गेली पाहिजेत. हिंदुस्थानात ती बनवणं सहज शक्य आहे, पण इथे आल्यावर त्यांना कळलं की, हे वाटतं तेवढं सोपं नाही. 1996साली जेव्हा हिंदुस्थानात ते परत आले तेव्हा इथे विमानं बनतच नव्हती. विमानं बनवण्यासाठी हिंदुस्थानी कंपन्याच नाहीत.

त्यावेळेस त्यांनी अमेरिकेतील विमानांप्रमाणे आपल्याकडेही विमाने बनवण्याचा निश्चय केला. याविषयी अमोल यादव सांगतात, 1995 साली आम्ही पहिलं विमान बनवायला सुरुवात केली, पण काही दिवसांनी कळलं की, विमान बनवताना बऱ्याच चुका राहिल्या आहेत. त्यासाठी कशा पद्धतीने विमान असायला हवे याचा परत अभ्यास करायला सुरुवात केली आणि 1999 साली पुन्हा नव्याने विमान बनवायला सुरुवात केली. 2003 साली विमान पूर्ण तयार केले. त्या विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी हवी होती, परंतु तेव्हा आपल्याकडे तसे काही नियमच नव्हते. त्यावेळेस ते विमान बनवणं, तो प्रयोग पुढे करणं शक्य नव्हते. हातात पैसे नसल्यामुळे तो प्रोग्राम थांबवावा लागला. दरम्यान, 2005मध्ये मला जेट एअरवेजमध्ये नोकरी लागली आणि मग माझ्याकडे पैशांची चणचण कमी झाली. त्यामुळे मी पुन्हा त्याच जोमाने 2009मध्ये हे विमान घराच्या गच्चीवर बनवायला सुरुवात केली. माझ्याकडे दुसरी जागा नव्हती आणि भाडय़ाने जागा घेऊन त्याचं भाडं द्यायचं, शेड बांधायची हे माझ्यासाठी खर्चिक होतं. त्यामुळे ते घराच्या गच्चीवर बनवणे परवडत होतं. त्या गच्चीवर आम्ही एवढे कम्फर्टेबल झालो की, काही दिवसांनी विमान तिथेच पूर्ण केलं.

पैसे कमवून आणि जमवून विमान केले
विमान बनवणे ही फार सोपी गोष्ट आहे, परंतु विमानासाठी लागणारी डीजीसीएची परनावगी, आर्थिक पाठबळ या गोष्टी उभ्या करणं फार कठीण होतं. कारण मी स्वतःच विमानासाठी पैसे कमवून आणि जमवून त्यावर खर्च केलेले आहेत. त्यामुळे हा फार कठीण कार्यक्रम होऊन बसलेला. मला कुठलीही थोडीशी महागडी गोष्ट घ्यायची असेल तर दोन-तीन महिने काम करून पगार जमा करून ती घेतली जायची. त्यामुळे उशीर खूप झाला. त्यात विमान बनवायचं असं सांगितल्यावर ते यशस्वी होईल की नाही या शंकेने कोणी आर्थिक मदत देऊ करत नाही. त्यामुळे विमान बनवणं फार कठीण होऊन बसतं. माझं एकोणीस जणांचे एकत्र कुटुंब आहे आणि त्यातील प्रत्येक जणाने मला मदत केलेली आहे. त्याचबरोबर विमानावर काम करण्यासाठी काही इंजिनीअर आहेत, फॅब्रिकेटर आहेत. म्हणजे जवळपास आम्ही तीस ते चाळीस जण आहोत, जे या विमानासाठी कायम धडपडत असतो, ते सांगतात.

धुळ्यातून पहिले उड्डाण…
हे सहा आसनी विमान आहे. ब्रिटिशांनी ज्यावेळी हिंदुस्थानवर राज्य केले, त्यावेळी ब्रिटिशांनी प्रत्येक जिह्यामध्ये विमानतळ बनवले होते आणि प्रत्येक जिल्हा विमान सेवेने जोडलेला होता. म्हणजे आपण महाराष्ट्राबद्दल जर विचार केला त्यामध्ये तीसपेक्षा जास्त विमानतळ आहेत आणि त्यातले मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर हे चार विमानतळ सोडले तर कुठल्याही जिह्यात विमानाने जाता येत नाही. तिथे नागरी सुविधा नाही. सहा आसनी विमान आपण आधीच बनवलेलं आहे. त्याची परवानगी आपल्याला नुकतीच मिळाली. डिसेंबरमध्ये धुळ्यातून या विमानाचे पहिले उड्डाण अपेक्षित आहे. सध्या हे विमान धुळे एअरपोर्टवर आहे आणि त्याची फ्लाईट टेस्टही होईल.

सर्वसामान्यांना संकल्पनेचा फायदा
विमान बनवण्याची संकल्पना सर्वसामान्यांसाठीच आहे. अशी आपल्याला भरपूर विमाने बनवायची आहेत. कमीत कमी प्रत्येक माणसाने एकदा तरी त्या विमानाने प्रवास करावा एवढी तरी अपेक्षा आहे. ज्यांना काही वेळेला  तत्काळ कुठे जायचे असते, त्यावेळी या विमानाचा वापर केला जाऊ शकतो. सर्वसामान्य लोकांना समोर ठेवून हे विमान बनवले आहे. सुरुवात झालेली आहे आणि शासनाने यासाठी मदत करणं गरजेचे आहे. जेव्हा मदत होईल, त्यावेळी हा प्रकल्प पुढे जाऊ शकतो असे मतही अमोल यादव व्यक्त करतात.

[email protected]