रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लूट होत असल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मनमानी कारभार सुरु असून वाहन मालकांची लूट होत असल्याचा आरोप रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएनचे अध्यक्ष विकास सावंत आणि उपाध्यक्ष प्रदीप साळवी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. वाहन पासींगसाठी गाडीमालकांना महिनाभर रखडवले जाते आहे. पंधराशे  रुपयांत मिळणारी रेडियमची पट्‌टी एजंटकडून घ्यायला सांगून त्यासाठी 4 हजार 700 रुपये उकळले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. ते वाहन मालकाकडून पैसे उकळण्याचे काम करत असून त्यांना अधिकारी वर्गाचा वरदहस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

प्रदीप साळवी यांनी सांगितले की, वाहन पासिंगसाठी प्रचंड विलंब होत आहे. रत्नागिरीमध्ये तब्बल 30 दिवस वाहन पासींग मिळत नाही़. 30 दिवसांहून आधिक कालावधी लागतो. 30 दिवसांत पासींग झाले नाही तर गुन्हे दाखल केले जातात. हे गुन्हे दाखल करणे थांबवावे अशी मागणी आम्ही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्याकंडे केली आहे.

गाड्यांना लावण्यात येणार्‍या रेडियम पट्‌ट्या बाजारात पंधराशे ते सोळाशे रुपयांना मिळतात. मात्र, उपप्रादेशीक परिवहन कार्यालयात एजंटकंडूनच रेडियमच्या पट्‌ट्या तब्बल 4 हजार 700 रुपयांना विकत घ्यायच्या आणि त्याची पावती जोडायची असे प्रकार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात घडत आहेत़. कोल्हापूरात वाहनांचे पासींग तात्काळ मिळत असताना रत्नागिरीमध्ये 30 दिवसांचा विलंब का लागतो़,10 हजार रुपये दिले की, तात्काळ पासींग दिले जाते असा आरोपही विकास सावंत यांनी केला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचारी कमी  आणि एजंट जास्त आहेत असा आरोपही सावंत यांनी केला. फिटनेस सर्टिफिकेटसाठीही पैसे घेतले जातात़ एकप्रकारे वाहनचालकांची पिळवणूक सुरु असल्याने आम्ही त्याविरोधात पावले उचलत आहोत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांची भेट घेऊन आमच्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले आहे. आमच्या मागण्या महिनाभरात मान्य  झाल्या नाही तर वाहनबंद आंदोलन छेडू असा इशारा विकास सावंत आणि प्रदीप साळवी यांनी दिला. यावेळी विकास पाटील, वसंत पाटील, दिनेश सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.