मराठवाड्यात परतीच्या पावसाने हाहाकार; 29 लाख हेक्टरवरील पिकांच नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसाने मराठवाड्यात हाहाकार माजवला असून 29 लाख 57 हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापसाचे पीक हातातून गेल्याने  साडेआठ हजार गावातील जवळपास 30 लाख शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. महसूल विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत ही माहिती समोर आली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी कोरड्या दुष्काळाशी सामना करताना मेटाकुटीला आला आहे. आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली आहे. पावसाळा संपल्यानंतर झालेल्या या पावसाने शेतशिवारावर मरणकळा आणली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यात परतीच्या पावसाने धूमशान घालून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. या पावसाने मराठवाड्यातील तब्बल 29 लाख 57 हजार 500 हेक्टरवरील खरिप पिकांचा चिखल झाला आहे. यात 12 लाख 28 हजार 940 हेक्टरवरील सोयाबीनची पुरती नासाडी झाली असून 11 लाख 44 हजार 429  हेक्टरवरील कापूस सडला आहे. काढणी झालेल्या मका, बाजरीच्या कणसांना जागेवरच कोंभ फुटले आहेत. या अस्मानी संकटामुळे मराठवाड्याच्या 8450 गावांतील 30 लाख 25 हजार शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवल्याचे महसुल विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. परतीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले आहे. त्यापाठोपाठ संभाजीनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात पावसाने धूमशान घातले आहे. विशेष म्हणजे  गेल्या वर्षी बीड जिल्हा पावसाच्या थेंबासाठी आसुसला होता. पाऊसच नसल्यामुळे बीड जिल्ह्यात वर्षभरात हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.