अनेकांच्या मनात धरसोड सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष राज्यात फिरत असताना जिल्हाध्यक्ष जर असे वागत असतील तर लोक कशाला मते देतील! जे सोडून गेले ते गेले, कुणाला जायचे आहे तर आताच जा अशा कानपिचक्या पक्षांतर करू पाहणाऱ्यांना देतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी निवडणुकीचा निकाल असा लागला आहे की जे सोडून गेले तेच माघारी येऊ का म्हणत आहेत असा टोला आज लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक झाली. या कार्यक्रमावेळी अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची स्थिती आपल्याला माहीत आहे, पण शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षाला उभे केले. झालेल्या निवडणुकीत जे पराभूत झाले आहेत त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही. कुठे कमी पडलो याचे चिंतन केले पाहिजे. पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा. पराभव झाला म्हणजे सर्व संपले असे नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाही मोठा पराभव झाला होता, मात्र त्यांनी नव्या दमाने सुरुवात केली आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले.
थांबून चालणार नाही
पराभूत झालेले लोक विधान परिषदेवर घ्या असं सांगायला येतील. त्यांनी त्या स्वप्नात राहू नका. अच्छे दिन येतील या भ्रमातही राहू नका असा सल्लाही अजितदादा पवार यांनी दिला. राज्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अवकाळी भागांची पाहणी करत आहेत. आतापासून माझ्यासह राष्ट्रवादीचे नेते राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करा. नव्या दमाच्या तरुणांना संधी द्यायला हवी. थांबून चालणार नाही, कामाला लागा, असेही अजित पवार म्हणाले.



























































