ऑनलाइन वाईन पडली महागात, सायबर भामट्याने केली फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन वाईन मागवणे अभिनेत्याला चांगलेच महागात पडले आहे. सायबर भामटय़ाने त्याची अडीच लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरात ऑनलाईन दारूच्या नावाखाली सायबर भामटय़ांचे फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. भामटय़ाने बॉलिवूडमधील एका अभिनेत्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्रारदारानी गेल्या महिन्यात गुगल वर ऑनलाईन वाईन शॉप चा नंबर सर्च केला. त्या नंबरवर अभिनेत्याने फोन केला. तेव्हा भामटय़ाने आपण कॅश ऑन डिलिव्हरी करत नसल्याचे भासवले. क्रेडिट कार्ड ने फक्त व्यवहार करतो अशा भूलथापा भामटय़ाने मारल्या.

भामटय़ाने क्रेडिट कार्डची माहिती घेत अभिनेत्याच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मागून घेतला. अभिनेत्याने ओटीपी दिल्यावर त्याच्या बँकखात्यातून 61 हजार रुपये काढले. त्याने पैशाबाबत विचारणा केली, तेव्हा भामटय़ाने चुकून पैसे गेले असल्याचे सांगून पुन्हा ओटीपी नंबर मागून घेतला. तो ओटीपी नंबर अभिनेत्याने शेअर करताच त्याच्या बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढले. पैसे गेल्याने अभिनेत्याने ते कार्ड ब्लॉक केले. त्याने घडल्या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. अभिनेत्याच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाइन फसवणुकीच्या घटना

– ऑक्टोबर महिन्यात मालाडमधील तरुणाला 300 रुपयाची बिअर 60 हजाराला पडली.

– खार मध्ये राहणाऱया महिलेने ऑनलाईन दारू मागवली. तिच्या खात्यातून 2 लाख 94 हजार रुपये काढले.

– सप्टेंबर महिन्यात एका इव्हेंट मॅनेजरची अशा प्रकारे 21 हजारांची फसवणूक केली होती.

सावधगिरी बाळगायला हवी

सर्च इंजिनवर मिळालेला नंबर हा खरा आहे का तो तपासले पाहिजे. सायबर भामटे हे सर्च इंजिनमध्ये फेरफार करतात. खऱया नंबर ऐवजी दुसरा नंबर देतात. फसवणूक केल्यावर भामटे हे फोन बंद करतात. बनावट कागदपत्रांच्या मदतीने भामटे हे सिम कार्ड घेतात. त्यामुळे अशा भामटय़ाचा शोध घेणे कठीण असते.

– सर्च इंजिन वर मिळालेला नंबर तपासणे आवश्यक.

– ऑनलाईन व्यवहार करताना मोबाईलवर आलेला ओटीपी कोणाला शेअर करू नये.