
बेळगावहून गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणाचा आश्वे – मांदे येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. आदित्य अभयकुमार मगदूम (26) आणि अभिजित अशोक मगदूम (33) अशी मृतांची नावे होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव येथील सहा जणांचा एक गट आश्वे- मांद्रे येथील समुद्र किनाऱ्यावर शनिवार दुपारी फिरण्यासाठी आला होता. त्यातील पाच जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र त्यावेळी आदित्य आणि अभिजित या दोन चुलत भावांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. त्यांच्या सोबत असलेल्या अन्य एका तरुणाला बुडत असताना जीवरक्षकांनी वाचवले आहे. त्याला म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पेडणे तालुक्यातील मांद्रे तसेच हरमल येथे आठ दिवसांत एकूण पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, अनुभवी जीवरक्षक समुद्र किनाऱ्यांवर नसल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.





























































