
पूर्व द्रुतगती मार्ग आणि वांद्रे -कुर्ला संकुलास जोडणारा तसेच शीव ते धारावी हे अंतर 30 मिनिटांनी कमी करणारा ‘बीकेसी कनेक्टर’ हा उड्डाण पूल रविवारी सायंकाळपासून जनतेसाठी खुला केल्याचे ट्विट राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील तीन नवीन मेट्रो मार्गाच्या पायाभरणी समारंभावेळी बीकेसी कनेक्टरचे भरपूर कौतुक केले होते. तसेच या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधलेल्या 1.6 किलोमीटर लांबीच्या, 17 मीटर रूंदी आणि चार पदरी असलेल्या बीकेसी ते चुनाभट्टी उन्नत मार्गामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरुन वांद्रे-कुर्ला संकुल गाठताना तीन किमी अंतर वाचणार आहे. माशाच्या पोटाचा आकार असलेला हा ‘फिशबेली’ उन्नत पुल बीकेसी, बाबुभाई कम्पाऊंड, मध्य रेल्वे (शीव स्थानकाजवळ), डकंन कॉलनी, हार्बर मार्ग (चुनाभट्टी स्थानक), सोमय्या मैदान आणि पूर्व द्रुतगती मार्ग येथे पुन्हा जमीनीवर येणार आहे.
समारंभ झालाच नाही
पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हा पूल सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. त्या वेळी शेकडो कार्यकर्ते चुनाभट्टी येथे उपस्थित झाले होते. त्यानंतर एमएमआरडीएने 9 नोव्हेंबर रोजी हा उन्नत मार्ग वाहतुकीस खुला केला जाईल असे म्हटले होते. सध्या राजकीय वातावरण तापले असताना या उन्नत मार्गाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार की कोणत्याही समारंभाशिवाय तो वाहतुकीस खुला होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र हा उन्नत मार्ग कोणत्याही समारंभाविनाच वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
जनतेच्या भल्यासाठी आपण बीकेसी ते चुनाभट्टी कनेक्टर उड्डाणपूल आज संध्याकाळपासून प्रवाशांसाठी खुला करीत आहोत.
– देवेंद्र फडणवीस, काळजीवाहू मुख्यमंत्री


























































