
स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार सहा महिन्यांपूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची गरज असताना अद्याप परळ कर्मचारी वसाहतीची दुरुस्ती सुरू करण्यात आली नसल्याचे सोमवारी शिवसेनेने ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत उघड केले. या ठिकाणी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल करतानाच शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी ‘बेस्ट’च्या अनेक कर्मचारी वसाहतींसह डेपो इमारतींच्या दुरवस्थेचा पाढाच यावेळी वाचला.
कोसळणारे स्लॅब, लिकेज झालेली ड्रेनेज लाइन, मैदानावर वाढलेली झाडे-झुडपे आणि रस्त्याच्या दूरवस्थेमुळे परळच्या ‘बेस्ट’ वसाहतीमधील कर्मचारी हैराण झाले आहेत. परळच्या ‘बेस्ट’ वसाहतीत सुमारे 1060 कर्मचारी कुटुंबासह राहत आहेत. या ठिकाणी अनेक वेळा दुर्घटना घडत असल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण असल्याचे शिवसेना नगरसेवक अनिल कोकीळ यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी महाव्यवस्थापकांनी तातडीने व्हिजिट देऊन दुरुस्तीसाठी कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली होती. ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनीदेखील तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न करता आजच्या बैठकीत केवळ परळ कर्मचारील वसाहतीमधील ए, एम, ओ, पी इमारतींचा छज्जा आणि ड्रॉप वॉल कापून काढणे इतक्याच कामाचा प्रस्ताव मांडण्यात आला.
यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार तातडीने दुरुस्ती सुचवण्यात आली असताना सहा महिने झाले तरी अद्याप निविदा मागवत असल्याचे कोकीळ यांनी सांगितले. कर्मचाऱयांच्या पगारातून वसाहतींचा मेंटेनन्स कापून घेता मग त्यांना नागरी सुविधा का देत नाही असा सवाल आशीष चेंबूरकर यांनी केला. ‘बेस्ट’च्या सर्वच वसाहतींची दूरवस्था झाल्याचे चेंबूरकर, भाजपचे प्रकाश गंगाधरे म्हणाले. त्यामुळे मुंबईतील सर्व बेस्ट कर्मचारी वसाहतींचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हीजेटीआय, आयआयटीसारख्या संस्थांकडून करून घ्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी सुहास सामंत, सुनील गणाचार्य, भूषण पाटील यांनीदेखील कर्मचारी वसाहती, डेपो इमारतींच्या वसाहतींची दूरवस्था मांडून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
इमारतीच्या बांधकामानंतर 30 वर्षांनी वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक काम करणे गरजेचे असल्याचे आशीष चेंबूरकर यांनी सांगितले. मात्र बेस्ट वसाहती, डेपोच्या अनेक इमारती 50 ते 60 वर्षे होऊनही प्रशासन त्या नव्याने बांधण्याऐवजी केवळ डागडुजी का करीत आहे असा प्रश्न उपस्थित करून दुर्दैवाने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर धोका टाळण्यासाठी कर्मचारी वसाहती आणि बस डेपो इमारतींच्या प्रश्नाबाबत प्रशासनाने विशेष धोरण ठरवावे असे निर्देश ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिले. या प्रश्नाबाबत खास बैठक घेण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.


























































