
सांताक्रुझमध्ये लवकरच मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक होणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यातून आणि पालिकेच्या माध्यमातून होणाऱया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे परिसरातील हजारो रहिवासी-प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. या स्कायवॉकचे भूमिपूजन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकरांना दर्जेदार सेवासुविधा देण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. आपल्या कारकीर्दीमधील हे उल्लेखनीय आणि अविस्मरणीय काम असल्याचे प्रतिपादन स्कायवॉकसाठी पाठपुरावा करणारे विद्यमान सुधार समिती अध्यक्ष आणि स्थानिक शिवसेना नगरसेवक सदा परब यांनी केले. या पुलामुळे या परिसरातील वाहतूककोंडी आणि गर्दीतून रहिवासी-प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचेही ते म्हणाले. तर खासदार विनायक राऊत यांनीदेखील सदा परब यांच्या कामाबद्दल कौतुकोद्गार काढले. याप्रसंगी उपमहापौर हेमांगी वरळीकर, आमदार संजय पोतनीस, नगरसेकक दिनेश कुबल, नगरसेविका प्रज्ञा भुतकर, रोहिणी कांबळे, ‘एच/पूर्व व एच/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्ष चंद्रशेखर वायगंणकर, संजना मुणगेकर, उप आयुक्त पराग मसुरकर, सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार, उप प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर आदी मान्यवर उपस्थित होते.
असा होणार स्कायवॉक
सांताक्रुझ पूर्व येथील ‘एमएमआरडीए’च्या पुलापासून नव्या सरकत्या जिन्यांच्या पुलाचा विस्तार करण्यात येणार आहे. या स्कायवॉकची लांबी 500 मीटर, रुंदी 4 मीटर असेल. स्कायवॉकच्या पायाचे बांधकाम पाइल फाऊंडेशनचे राहणार असून बांधकामाचा प्रकार स्ट्रक्चरल स्टील व आरसीसी पाइल, काँक्रीट स्लॅब असा असेल. या स्कायवॉकच्या बांधकामाचा खर्च 20 कोटी 16 लाख 57 हजार इतका आहे. 18 महिन्यांत याचे काम पूर्ण होणार आहे.




























































