
मुंबईचे अग्निशमन दल उभे करण्यात मोलाची कामगिरी बजावणारे निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी डी. जे. कुलकर्णी यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. अग्नीसुरक्षेच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असणाऱ्या डी. जे. कुलकर्णी यांचा झुंजार आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून नावलौकिक होता.
भोपाळ येथे शनिवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोमवारी सकाळी संभाजीनगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. फायर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच मुंबई अग्निशमन दलात 1960 साली फायर ऑफिसर म्हणून प्रवेश करणारे दुर्गादास जगन्नाथ कुलकर्णी 1997 मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले.
अग्निशमन दलातील एक निष्णात, धडाकेबाज आणि लढवय्या अधिकारी अशी त्यांची ओळख होती. 37 वर्षांच्या सेवाकाळात मुंबईतील अनेक अग्निकांडे शमवण्यात त्यांनी धाडसी कामगिरी बजावली. कितीही मोठा अग्नीप्रलय असो आग विझवण्यासाठी वरिष्ठ म्हणून जवानांना केवळ आदेश न देता स्वतः आगीच्या लोळांत उडी घेऊन ते मोहिमांचे नेतृत्व करत. अशाच एका मोहिमेत त्यांना आपला एक डोळाही गमवावा लागला.

ब्रिटनच्या साऊथ वेल्स येथे अग्निशमन अभियांत्रिकीचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डी. जे. कुलकर्णी यांचा मुंबईचे अग्निशमन दल सक्षम करण्यात मोठा वाटा होता. फायर सेफ्टी, फायर प्रिव्हेन्शन आणि आपत्ती व्यवस्थापनातील जाणकार तज्ज्ञ असलेल्या डी. जे. कुलकर्णी यांनी अग्नीशमन सुरक्षा, प्रतिबंधक उपाय आणि सेवांची अभ्यासपूर्ण नियमावली तयार केली. तीच नियमावली आज देशभरात वापरली जाते. 1997 साली मुंबई महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावरून निवृत्त झाल्यानंतर एअर इंडियामध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून त्यांनी विमानतळावरील अग्नीसुरक्षेची जबाबदारी पार पाडली. याशिवाय पोर्ट ट्रस्ट, सिडको आदी संस्थासाठीही कन्सल्टंट आणि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले.

अग्निशमन क्षेत्रातील उत्कृष्ट आणि अतुलनीय सेवेबद्दल 2 आणि 3 शौर्य सन्मान अशी पाच राष्ट्रपती पदके प्राप्त करणारे डी. जे. कुलकर्णी हे अग्निशमन दलातील बहुधा एकमेव अधिकारी होते. त्यांच्या निधनाने आगप्रतिबंधक उपाययोजना, अग्निशमनातील आधुनिक उपायपद्धती आणि आपत्ती व्यवस्थापनाचा चालताबोलता विश्वकोशच हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.


























































