सातभाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी

सातभाई – किती मजेशीर नाव आहे, जणू हिंदुस्थानमधील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आहेत त्याचप्रमाणे!! सातभाई हे पक्षी नेहमी 6-7 जणांच्या घोळक्याने वावरतात म्हणूनही कदाचित त्यांना असे नाव दिले असावे!!

सातभाई पक्षी स्थानिक असून त्यांचे वास्तव्य पानगळीची जंगले, आर्द्र जंगले, निम्नहरित जंगले, शहरातील उद्याने इत्यादी ठिकाणी असते. हे पक्षी पाल्यापाचोळ्यात ‘सरपटणाया प्राण्यांप्रमाणे’ मात्र शेपटी उंच करून जमिनीवर फिरताना व उडया मारताना आढळतात. त्यांची साद उंच स्वरात असून धोक्याची सूचना देताना खूपच किंचाळतात. कळपामध्ये हे पक्षी सहकारी वृत्तीने एकत्र राहतात पण कधीतरी मतभेदाचा प्रसंग उद्भवला तर एकमेकांत नखे व चोच यांचा शस्त्र म्हणून वापर करून स्वैर लढतात. मोठया पशुपक्ष्याने हल्ला केल्यास मात्र एकत्र येऊन त्याला परतवतात. ह्या पक्ष्यांचे वैशिष्टय म्हणजे, सहकायांशिवाय ‘पावश्या व चातक’ पक्ष्यांची अंडी आपल्याच घरटयामध्ये अतिशय काळजीने सांभाळतात. ह्या पक्ष्यांचे खाद्य ‘कीटक, धान्य, बिया, छोटी फळे, बेरीज’ आहे. आपोआपच अनेक बीजे जंगलाच्या विविध क्षेत्रात पडून वर्षभर नैसर्गिकरीत्या परागीकरण घडते.

सामान्य सातभाई
हे पक्षी उत्तर पाकिस्तानपासून उत्तरपश्चिम भारतापर्यंत आणि दक्षिण पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि लक्षद्वीप बेटे येथे आढळतात. लांब शेपटी असलेला हा छोटा पक्षी, सडपातळ असून वरील बाजूस ‘फिक्कट पिवळा व राखाडी’ रंगाचा असतो व त्यावर गडद रेषा असतात. खालील बाजूस रेषा नसून फिक्कट रंगाचा व गळा बराचसा पांढया रंगाचा असतो.

भारतात ह्या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ एप्रिल ते जुलै असतो. ह्या काळात मादी दोनदा अंडी घालते. प्रजनन काळात सुद्धा इतर पक्ष्यांमध्ये ते मिसळतात. नर व मादी काटेरी झुडूपांमध्ये कपाच्या आकाराचे घरटे बांधतात. मादी सुमारे 2 – 3 फिक्कट आकाशी रंगाची अंडी घालते. 13 ते 15 दिवस ते अंडी उबवतात. शिशु पक्ष्यांचा रंग प्रथम फिक्का पिवळा असून नंतर तो बदलतो.

काळ्या हनुवटीचा सातभाई
काळ्या हनुवटीचा सातभाई `Timaliidae’ कुटुंबाचे सदस्य आहेत. ह्या प्रजाती भारतीय उपमहाद्वीपच्या उत्तरेकडील भागात आढळतात. त्यांचे नैसर्गिक निवासस्थान समशीतोष्ण जंगले आणि उपोष्णकटिबंधीय किंवा उष्णदेशीय ओलसर वन्य जंगल असते.

काळ्या डोक्याचा सातभाई
भारतातील पश्चिम घाटात आणि श्रीलंकेतील जंगलात त्यांचे वास्तव्य आढळते. हे पक्षी लालसर तपकिरी रंगाचे असून त्यांच्या डोक्यावर गडद काळी टोपी असते. खालील बाजूचा रंग पांढरा असून डोळे पिवळ्या रंगाचे असतात. त्यांचे खाद्य कीटक असते. जंगलात घोळक्याने जमिनीवर पडलेल्या पाल्यापाचोळ्यात मोठमोठयाने आवाज करत खाद्य शोधत असतात. . ह्या पक्ष्यांचे उडणे जलद नसते, बरेच वेळा हे पक्षी धडपडत फांदीवर चढताना दिसतात परंतु धोक्याची चाहूल लागली तर लगेचच जमिनीवर येतात. प्रजनन काळ मे ते जुलै असतो. ह्या पक्ष्यांचे घरटे झुडुपांमध्ये बांबूच्या पानांपासून बनविलेले असते. मादी एकावेळी दोन अंडी देते.

जंगलभाई
नर व मादी सारखेच दिसतात. त्यांचा रंग काहीसा तपकिरी राखाडी असून चोच पिवळ्या रंगाची असते. प्रदेशाप्रमाणे रंगात थोडाफार बदल दिसतो. वरील बाजू थोडी गडद रंगाची असून छाती व गळ्यावर ठिपके असतात. ह्यांची साद अनुनासिक असते. ह्या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ वर्षभर असतो. त्यांचे घरटे झाडाच्या अर्ध्या उंचीवर झावळीमध्ये लपलेले असते. मादी 3-4 (कधीकधी 7)अंडी घालते. अंडी गडद हिरव्या निळ्या रंगाची असतात. हे पक्षी आपल्या भागात सहसा इतर पक्ष्यांना येऊ देत नाहीत.

ठिपकेवाला सातभाई
रंग फिक्कट तपकिरी असून खालील बाजूस फिक्कट पिवळा असतो. डोक्यावर नक्षीकाम असून छाती व बाजूवर लांब रुंद रेषा, ठिपके असतात. त्यांचे गाणे उंच स्वरात वारंवार ठवाई-चूठ किंवा ठवाई-टी-चूठ असते. त्यांचा प्रजननाचा काळ मार्च-ऑगस्ट असून मादी वारंवार अंडी घालते. त्यांचे घरटे ठिसूळ असून घुमटाच्या आकाराचे असते. प्रवेशदार बाजूस असते.

सातभाई प्रजातींमध्ये बरेच साम्य जरी दिसले तरीसुद्धा प्रत्येकाचे काहीतरी वेगळे वैशिष्टय, खुबी असल्यामुळे मला त्यांचे फोटो काढण्याची प्रेरणा मिळाली.