
>>सुवर्णा क्षेमकल्याणी
समाजात राहून माणूस खूप काही शिकत असतो. आयुष्यात येणारे अनेक बरेवाईट प्रसंग त्याला घडवत असतात. तोच माणूस संकटांवर मात करून एक सुरळीत आयुष्य आनंदात जगत असताना पुन्हा नियती घात करते, पण त्याला सामोरं जाऊन एक वेगळा ध्यास घेऊन इतरांसाठी काहीतरी करण्याची ऊर्मी ती घटना देऊन जाते. ही कथा आहे ‘आपलं घर’ या संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर यांची..!
बालपणी वडील गेल्यानंतर अठराविश्वदारिद्रय़. आई इतरांच्या घरी जाऊन धुणीभांडी करून पोट भरतेय हे सगळं पाहून त्रासून 10 वर्षांचा विजय नागपूरहून मुंबईला पलायन करतो काय, मुंबादेवी मंदिराच्या पायरीवर बसून दीड वर्ष मागितलेली भीक, मग कधी गिरगाव चौपाटीवर बसून पोटाची खळगी भरण्यासाठी केलेले कष्ट, गरिबीमुळे प्रसंगी आलेले अनेक वाईट अनुभव असं आयुष्य जगताना एक आशेचा किरण विजय फळणीकर यांच्या आयुष्यात आला. मुंबादेवी मंदिराच्या पायरीवर बसून भीक मागणाऱ्या हाताला समोरून एक आधाराचा, विश्वासाचा हात मिळाला, समोरची व्यक्ती (यशवंत रामकृष्ण काळे). ‘पोरा चांगल्या घरातला दिसतोयस, इथे काय करतोयस?’ असं विचारताच विजय यांनी सगळी हकीकत सांगितला. या भल्या माणसाने विजय यांची बालसुधारगृहात रवानगी केली आणि आयुष्याला एक नवं वळण मिळालं. काही वर्षे तिथे वास्तव्य केल्यानंतर तिथल्या नियमानुसार सातवीनंतर त्यांना त्याच्या राहत्या ठिकाणी अर्थात नागपूरला पाठवण्यात आलं. सुधारगृहातले संस्कार, शिस्त त्यांना भविष्यात कामी आले आणि त्याच बळावर दिवसा नोकरी आणि रात्रशाळा करत मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन पुढे अर्थार्जनासाठीचा प्रवास सुरू झाला. पुण्याच्या बालचित्रवाणीमध्ये मंच सहाय्यक पदावर ते रुजू झाले. त्यानंतर लग्न, सुखी वैवाहिक जीवन, पुत्रप्राप्ती असे सुखद टप्पे पार करत दुसरीकडे आकाशवाणीवरील जाहिरात क्षेत्राच्या नव्या दालनात प्रवेश आणि नंतर प्रतिमा कम्युनिकेशन नावाचं डॉक्युमेंटरी फिल्म्स, मालिका, जाहिराती इत्यादींची निर्मिती करणारं स्वतःचं ऑफिस एकूणच सगळं सुरळीत सुरू होतं. सगळं मनासारखं होतंय असं वाटत असताना नियतीने पुन्हा एकदा घात केला. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांच्या मुलाचा रक्ताच्या कर्करोगाने मृत्यू झाला आणि आयुष्यात पुन्हा एकदा नैराश्याची खोल दरी निर्माण झाली. इथेही एका घटनेमुळे एका सकारात्मक गोष्टीची सुरुवात झाली. मृत्यूनंतर रुग्णवाहिका यायला झालेल्या विलंबामुळे विजय फळणीकर यांनी धडा घेतला आणि मुलाच्या विम्याचे पैसे गुंतवून वैभवच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णवाहिका घेतली.
याशिवाय विजय यांच्या वाटय़ाला आलेलं आयुष्य आणि मुलाचा मृत्यू यामुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि आता समाजासाठी काहीतरी करायचं हे निःश्चित झालं ही गोष्ट फळणीकरांनी मित्रांजवळ बोलून दाखवताच 13 जणांच्या विश्वस्त मंडळाची स्थापना झाली आणि एप्रिल 2002 ला ‘स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन’ हा ट्रस्ट आकाराला आला. फळणीकरांचे मित्र पं. सुरेश वाडकर यांनी आपला ‘सुरमयी शाम’ हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करून ट्रस्टला सवापाच लाख रुपयांची देणगी मिळवून दिली आणि सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे कामाला सुरुवात झाली.

दिवसा नोकरी तर रात्री रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर बनून जनतेची चाकरी अशी दुहेरी वाटचाल सुरू झाली. पण तरीही मनात चलबिचल सुरू होतीच. विचार करत असता त्यांना अनाथाश्रमाची प्रेरणा मिळाली आणि फळणीकर पती-पत्नींच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. स्वतःचे दोन फ्लॅटस् विकून त्यांनी ‘वारजे’ येथे दोन गुंठे जमीन खरेदी केली. त्यांच्या पत्नीनेही आपले दागिने विकून त्यांना उत्तम साथ दिली आणि त्यावर बांधकाम होईपर्यंत लगतच छोटंसं घर भाडय़ाने घेऊन 3 ते 10 वयोगटांतील 14 मुलांसह ‘आपलं घर’ सुरू झालं. काळजी घ्यायला अत्यल्प पगारात रत्ना कंधारे आणि ननावरे मावशी पुढे आल्या आणि पालकांची संख्या दोनाची चार झाली. अशा रीतीने एकीकडे मुलगा गमावल्याचं दुःख असलं तरी या सेवेच्या रूपात तो कायम त्यांच्या सोबत असल्याची एक भावना त्यांना सुखावून गेली.
‘आपलं घर’ केवळ घर म्हणून मर्यादित न राहता अनेक सोयीसुविधांची मांदियाळी इथे आपल्याला अनुभवायला मिळते.इथे गोरगरीबांसाठी एक पैसाही न घेता रुग्णालयाची व्यवस्था त्यांनी केलीये शस्त्र्ाक्रिया विभाग, स्त्र्ााr-पुरुष रुग्णांसाठी वेगवेगळे वॉर्डस् (कक्ष), प्रसूतिगृह, ईसीजी व डिजिटल एक्स-रेची सोय, दंत विभाग व नेत्र चिकित्सा अशा सुविधा स्तिमित करणाऱया आहेत. शिवाय ‘आपलं घर’ची अद्ययावत मोबाइल मेडिकल व्हॅन डोक्यावर सोलर पॅनल घेऊन दररोज अतिदुर्गम खेडय़ांमध्ये जात असते. तिथल्या जवळपास 14 गावांना ही व्हॅन आरोग्य सोयी पुरवण्याचं काम नेमाने करतेय हे सगळं तिथे जाऊन बघण्यासारखं आहे यात वादच नाही. ‘आपलं घर’मध्ये सध्या 38 मुलं संस्कारक्षम आयुष्य जगात बंधनमुक्त जीवन जगतायत या सगळ्याचं श्रेय कुणाला, असं विचारताच विजय फळणीकर दादा प्रेमाने म्हणतात की, या सगळ्यासाठी लागणारा खर्च समाजातल्या दानशूर व्यक्तींमुळेच शक्य होतोय. संस्थेशी जोडले गेलेले सिनेक्षेत्रातले दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर, मृणाल कुलकर्णी ही मंडळी आवर्जून इथे भेट देतात. त्यांच्यासारख्या काही प्रेमळ स्नेहींमुळे हे काम खूप सोप होऊन जातं. हा सगळा डोलारा एकटय़ाने सांभाळणं शक्यच नव्हतं असंही ते सांगतात. हे सगळं काम करणारे विजय फळणीकर स्वतः मात्र कसलंही श्रेय घेत नाही यातच त्यांचं मोठेपण सिद्ध होतं. उपेक्षितांच्या जगण्यासाठी धडपडणारा फळणीकरांचा ‘आपलं घर’ हा प्रकल्प पुण्यात वारजे व डोणजे अशा दोन ठिकाणी समर्थपणे उभा आहे. डोणजेची जागा तर हिरव्यागार डोंगररांगांच्या मधोमध अगदी निसर्गाच्या कुशीत आहे. इथे अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ग्रामीण भागातील दहावी व बारावी नापास मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, हॉस्पिटल व फिरता दवाखाना असे एकूण पाच उपक्रम (सर्व विनामूल्य) चालतात. सगळ्या कौलारू बैठय़ा इमारती असा हा सुंदर उपक्रम…!!!
अशा या ‘आपल्या घरात’ प्रत्येकालाच आवडेल. संस्थेला दिलेलं हे नाव खऱ्या अर्थाने साजेसंच आहे. आज (24 नोव्हेंबर) संस्थेचा 18 वा वर्धापन दिन असून सामाजिक कार्य करणाऱया व्यक्तीचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे इथे ‘आपलं घर’ इथे सायंकाळी 5 वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे.


























































