बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सात वर्षांपूर्वी 68 लाख रुपयांचे सोने घेऊन पळालेल्या नोकराला अखेर गुन्हे शाखेच्या युनिट-10 ने अटक केली. संदीप दावजी शर्मा ऊर्फ रामविलास मोहितो असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक किलो सोने पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो नाव बदलून मानलेल्या बहिणीकडे राहत होता.

संदीप हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. आठ वर्षांपूर्वी तो नोकरीच्या शोधात गोवंडीत आला होता तेव्हा संदीपची एकाने तक्रारदारासोबत ओळख करून दिली होती. वर्तणूक चांगली असल्याने तक्रारदाराने संदीपला तळोजा येथील गोदामात कामाला ठेवले. सप्टेंबर महिन्यात तक्रारदार हे सोलापूरला गेले होते तेव्हा तक्रारदाराच्या पत्नीने संदीपला अंधेरी येथील फ्लॅटमध्ये कुराण आणण्यासाठी पाठवले. त्याने घरात कोणी नसल्याचे पाहून 68 लाख 20 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तीन वर्षे एमआयडीसी पोलिसांचे पथक संदीपचा शोध घेत होते, मात्र तो मिळून आला नव्हता. अखेर एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात ए समरी दाखल केली होती.

पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील माने, हनुमंत डोपेवाड, धारगळकर, सचिन ठोंबरे, दीपाली पवार, दया खाडे यांच्या पथकाने पुन्हा तपास सुरू केला. पोलिसांनी दोन महिने त्या केसचा अभ्यास केला. तपासादरम्यान पोलिसांना एक नंबर मिळाला. तो नंबर कोणाचा याचा शोध घेतला. त्यावरून पोलिसांनी संदीपची माहिती काढली. तो विलेपार्ले येथे सोने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून संदीपकडून एक किलो सोने जप्त केले.

अटकेच्या भीतीने वर्षभर तो झोपलाच नाही

सोने चोरल्यानंतर संदीप हा गुजरातहून उत्तर प्रदेशला गेला. उत्तर प्रदेशला त्याच्या मानलेल्या बहिणीकडे राहिला. पोलीस पकडतील या भीतीने संदीप हा वर्षभर झोपला नव्हता. रात्री-अपरात्री त्याला पोलिसांनी अटक केली असे भास होत होते. त्या सोन्याबाबत संदीपला त्याच्या बहिणीने विचारणा केली होती. ते मेहनतीचे सोने असल्याच्या त्याने भूलथापा मारल्या होत्या.