
महावितरण विभागाकडून वीज वाचविण्याबाबत संदेश दिले जातात. असे असताना अलिबाग येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला वीज वाचविण्याचे वावडे असल्याचा प्रकार समोर आला आहे. अलिबागमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील भांडरपाल कार्यालय आणि हॉलमध्ये कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसतानाही कार्यालयातील पंखे सुरू ठेवले गेले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यलयातच वीज वाचविण्याचे धडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे झालेले आहे.
अलिबागमधील सार्वजनिक बांधकाम विभागात भांडरपाल यांचे कार्यालय आहे. कार्यलयात एक अधिकारी यांची केबिन आणि कर्मचाऱ्यांना बसण्याचा हॉल आहे. कार्यालयात ना अधिकारी, ना कर्मचारी, सर्व कार्यालय खाली असूनही पंखे तसेच सुरू ठेवण्यात आलेले आहेत. तर विभागाच्या दुसऱ्या भागात गणपती बसविणाऱ्या हॉलमध्येही दोन फॅन सुरू ठेवण्यात आलेले आहेत.
विजेचा वापर कमी करा, घरी अथवा कार्यलयात कोणी नसेल तेव्हा पंखे, लाईट बंद करा अशा सूचना महावितरण विभाग देत असतो. घरातून बाहेर जाताना नागरिक सर्व वीज उपकरणे बंद करतात. त्यामुळे विजेची बचत होत असते. ही महत्त्वाची गोष्ट नागरिकांना लागू पडते तसेच ती शासकीय कार्यालयाला लागू असते. मात्र असे असूनही शासकीय कार्यालयात कोणीही नसताना पंखे, ट्यूब लाईट सुरू असल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे. स्वतःच्या घरातील वीज बंद करण्यास विसरत नसलेले हे कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात मात्र कोणीही नसताना फॅन, ट्यूब लाईट सुरू ठेवून निघून जात आहेत.




























































