अर्थव्यवस्था अधिकच गाळात, देशाचा विकासदर 4.5 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लडखडलेल्या हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचे चाक अधिकच गाळात रुतले आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत देशाचा विकासदर चक्क 4.5 टक्क्यांवर ढेपाळला आहे. मागील साडेसहा वर्षांतील हा सर्वात कमी विकासदर आहे. गुंतवणुकीचे कमी झालेले प्रमाण, देशांतर्गत वस्तूंचा रोडावलेला खप, औद्योगिक क्षेत्रातील मंदी याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी यासंदर्भात घोषणा केली. हा दर मागील तिमाहीपेक्षा 0.5 टक्क्यांनी तर गेल्या वर्षीच्या याच अवधीतील दरापेक्षा 2.5 टक्क्यांनी कमी आहे. याआधी 2013 मध्ये जानेवारी-मार्चच्या तिमाहीत सर्वात कमी म्हणजे 4.3 टक्के विकासदर होता.

शेतकरी, युवक आणि गरीबांचा विनाश
अर्थव्यवस्थेची अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. देशाला 8 ते 9 टक्के विकासदराची आशा होती, परंतु हा दर घसरून 4.5 टक्क्यांवर आला आहे. याचा शेतकरी, तरुणवर्ग आणि गोरगरीबांवर घातक परिणाम होईल, अशी चिंता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.