
नॅशनल फिश वर्कर्स फोरम या पारंपारिक मच्छीमारांच्या राष्ट्रीय संघटनेच्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची सुरवात शनिवारी भव्य-दिव्य रॅली व आसमंत दुमदुमनाऱ्या घोषणानी कोचीन (केरळ) येथे झाली. केरळ येथील पारंपरिक वाद्यांचा निनाद, कोळी वेशभूषेतील पेहराव केलेल्या मच्छिमार भगिनी व मच्छिमार बांधव यासह हाती निळे झेंडे व डोक्यावर निळ्या टोप्या परिधान केलेला विविध १० राज्यातील हजारोंचा जनसमुदाय कोचीन शहरातील रस्त्यावर उतरला होता.
पारंपरिक मच्छिमारांच्या देशभरातील सुमारे ३० संघटना नॅशनल फिश वर्कर्स फोरम या संघटनेशी संलग्न आहेत. एन. एफ. एफ. संघटनेच्या होणाऱ्या या कार्यकारिणी सभेमध्ये मच्छीमाराना भेडसावणाऱ्या स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय समस्यांवर चर्चा होणार आहे. तसेच संघटनेच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवली जाणार आहे. त्याचप्रमाणे निल अर्थव्यवस्था (Blue economy), सागरी मत्स्यपालन धोरण (Mariculture policy), मत्स्यव्यवसायातील महिलांचा सहभाग आणि समस्या तसेच इतर महत्वाच्या विषयावर चर्चासत्र व परिसंवाद, मार्गदर्शन होणार आहे.
महाराष्ट्राचा आवाज कोचीन मध्ये घुमला
मच्छीमार एकजुटीचा…विजय असो, समुद्र आमच्या हक्काचा… नाही कुणाच्या बापाचा…. या महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती व सिंधुदुर्गातील मच्छिमार बांधव यांच्या घोषणांनी कोचीन शहरात मराठीचा आवाजही जोरदार घुमला. कोचीन मरीन ड्राइव्ह येथून सुरु झालेल्या या रॅलीचा समारोप टाऊन हॉल येथे झाला. या अधिवेशनात हिंदुस्थानी किनारपट्टीवरील दहा राज्यातील मच्छीमार संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
































































