
आपण भारतीय जनता पक्ष सोडणार नसल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पक्षातील काही नेत्यांकडून सातत्याने आपला अपमान करण्यात येत आहे. अन्याय आणि अत्याचार होत राहिल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही खडसे यांनी दिला. खडसे यांना टार्गेट करण्यात येत आहे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आपल्याला विचार करावाच लागेल. त्यांची मते जाणून घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जळगावात झालेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आपल्याला पक्षाने खूप काही दिले आहे. पक्षासाठी आपण 40 वर्षे मेहनत घेतली आहे. पक्ष उभा करण्यात, पक्ष वाढवण्यात आणि संघटना मजबूत करण्यात आपला महत्त्वाचा वाटा आहे, त्यामुळे आपण पक्ष सोडणार नाही. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबादारी स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षसंघटना, पक्षबांधणी यासारखी कोणतीही जबाबदारी आपण पार पाडू. मात्र, सध्या निर्णय प्रक्रियेतूनच आपल्याला डावलण्यात आले आहे. कोअर कमिटीतही आपल्याला स्थान नाही. उत्तर महाराष्ट्र किंवा जळगवाच्या कोणत्याही कार्यक्रमांना आपल्याला बोलवण्यात येत नाही. आपले मत विचारात घेतले जात नाही. एकनाथ खडसे स्पर्धेत राहू नये म्हणून काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक हे करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हे असेच सुरू राहिले तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. कोणताही निर्णय पक्षाशी चर्चा करूनच घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी नेत्यांना डावलले जात आहे, असे आपण कधीही म्हणालो नाही. जनतेची आणि कार्यकर्त्यांची भावना आपण पक्षापर्यंत पोहचवली, आता पक्ष काय निर्णय घेतो, ते लवकरच समजेल असेही ते म्हणाले. ओबीसी नेतृत्वाला पक्षाने मोठे केले, तसे ओबीसी नेतृत्वानेही पक्ष मोठा केला आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्याला डावलण्यासाठीच आपल्यामागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोपही त्यांनी केला. पंकजा मुंडे आणि आपली मुलगी रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील काही नेत्यांनी केल्याचे ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी खडसे यांनी रोहिणी खडसे यांच्या पराभवाबाबत चर्चा केली आणि त्यांना काही पुरावेही दिले.






























































