
पासपोर्टवर आता कमळाच्या चिन्हाचा वापर करण्यात आला आहे. हे चिन्ह भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असल्याने विरोधी पक्षाने यावर आक्षेप घेतला आहे. पासपोर्टवर लावलेल्या कमळाच्या चिन्हावर विरोधकांनी आक्रमक रुप धारण केल्याने परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने याबाबत खुलासा केला आहे. सिक्युरिटी फिचर्स अर्थात सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून टप्प्याटप्प्याने देखातील इतर प्रतिकांचाही पासपोर्टवर वापर करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
केरळ राज्यातील कोझिकोट येथे कमळाचे चिन्ह असलेले पासपोर्ट जारी करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे खासदार एम.के. राधन यांनी हा मुद्दा उचलून धरला. राघवन यांनी लोकसभेत शून्यप्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित करत सरकारी संस्थांचे भगवेकरण करण्याचा घाट भाजपने घातल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचा वापर पासपोर्टवर करण्यात आला असून एका स्थानिक वृत्तपत्रानेही त्याबाबतचे वृत्त दिल्याचे राघवन यांनी लोकसभेत सांगितले.
पासपोर्टवर कमळ हा मुद्दा थेट संसदेतच हा मुद्दा उपस्थित झाल्याने परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ स्पष्टीकरण दिले आहे. आपले राष्ट्रीय प्रतिक असलेल्या फुलाचे चिन्ह पासपोर्टवर छापण्यात आले असून बनावट पासपोर्ट ओळखण्यासाठी आणि सेक्युरिटी फिचर्स मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

कमळाशिवाय टप्प्याटप्प्याने देशातील इतर प्रतिकांचाही पासपोर्टवर वापर करण्यात येणार आहे. आज पासपोर्टवर कमळाचे चिन्हं आहे, पुढच्या महिन्यात पासपोर्टवर वेगळे प्रतिक असेल. देशाशी संबंधितच प्रतिकांचा पासपोर्टवर वापर करण्यात येणार असल्याचेही रवीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.




























































