आठशेची बीअर पडली 91 हजारांना, तरुणाची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन बीअर मागवण्याच्या नावाखाली सायबर भामटय़ाने एकाला चुना लावल्याची घटना समोर आली आहे. कोड स्कॅनच्या भूलथापा मारून तरुणाच्या बँक खात्यातून 91 हजार रुपये काढले. फसवणूकप्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन वस्तू खरेदीच्या नावाखाली फसवणूक होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशाच प्रकारे तरुणाची भामटय़ाने फसवणूक केली. तक्रारदार हे अंधेरी परिसरात राहतात. 6 डिसेंबरला त्यांना बीअर प्यायची होती. त्यामुळे त्यांनी गुगलवर जवळच्या वाईन शॉपची माहिती सर्च केली. माहिती सर्च केल्यावर त्यांना एक नंबर दिसला. त्या नंबरवर तक्रारदारांनी फोन केला असता त्यांना बीअरची किंमत 800 रुपये सांगितली. त्यानंतर तक्रारदाराकडे कार्डचा यूपीआर नंबर मागितला आणि व्हॉटस्ऍपवर कोड पाठवला. तो कोड स्कॅन केल्यावर त्यांच्या खात्यातून 4 हजार 999 रुपये काढले गेले. पैसे गेल्याबाबत त्यांनी विचारणा केली असता चुकून पैसे गेले असून ते परत खात्यात जमा होतील अशा भूलथापा मारल्या. त्यानंतर पेमेंट सिस्टममध्ये दोष असल्याचे भासवून त्यांच्या खात्यातून 91 हजार रुपये काढले.