
मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादी दुरुस्ती ( ई .व्ही.पी. )व महिनाभर चालणारा मतदार पुननिर्रिक्षण कार्यक्रम यावर नगर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी बी.एल. ओ. शी संबंधित सर्व कामांना नकार दिल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व जूनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी शरद कोतकर यांनी दिली. नगर तालुक्यातील बी.एल.ओ. असलेले सर्व प्राथमिक शिक्षक व विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी नगर तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार माधव गायकवाड यांना याबाबतचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, मतदार यादी दुरुस्ती संबंधित काम हे वाडीवस्तीवर, पाडा, तांडा ,डोंगर, दरी, फ्लॅट येथे जाऊन प्रत्यक्ष राहत्या ठिकाणी मोबाईलद्वारे हायब्रीड अॅपची नोंदणी करावी लागणार आहे. हे काम अत्यंत जिकिरीचे व वेळखाऊ असून महिला शिक्षकांसाठी तर अत्यंत जोखमीचे आहे . प्राथमिक शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापन सांभाळून हे काम करणे शक्य नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे . अलाहाबाद उच्च न्यायालय, राष्ट्रीय निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानूसार या कामासाठी प्राथमिक शिक्षकांच्या सेवा कशा प्रकारे घेण्यात याव्यात याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशात स्पष्ट म्हटले आहे की, बीएलओ हे काम फक्त सुट्टयांच्या दिवशी (दीपावली व उन्हाळा सुट्टया ) व अध्यापन व्यतिरिक्त वेळेत देणे बंधनकारक आहे . मात्र, असे निर्देश असूनही उच्च न्यायालयाच्या निकालाचा वेगळा अर्थ लावून हे काम प्राथमिक शिक्षकांच्या माथी मारले जात असल्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे . सातारा व रायगड जिल्ह्याप्रमाणे अन्य जिल्ह्यातही स्थानिक पातळीवरील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी व आरोग्य कर्मचारी यांच्या सहाय्याने यशस्वीरित्या कार्य चालू असल्याचे निदर्शनास आणून दिले.
उच्च न्यायालयाने आदेशात पुढे म्हटले आहे की, स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या कामासाठी पूर्णवेळ घेता येईल. याच अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या आदेशानूसार प्राथमिक शिक्षकांना या कामातून वगळून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे . बीएलओच्या सर्वच कामांवर प्राथमिक शिक्षकांनी नकार दिला आहे. या कामासाठी जबरदस्ती झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे. यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे , इब्टा चे राज्य प्रतिनिधी आबा लोंढे शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळू देंडगे, जुनी पेन्शन हक्क संघटन शरद कोतकर, शिक्षक समितीचे राजेंद्र ठाणगे ,शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय कुलट,सुनील सोनवणे आदी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.






























































